Join us  

"धोनी हे भारतीय क्रिकेटसाठी वरदानच; पण मला वाटतं की..."; गौतम गंभीरचं रोखठोक विधान

गौतम गंभीर असंही म्हणाला- "धोनीच्या आधी भारताचे सगळे विकेटकिपर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 4:25 PM

Open in App

MS Dhoni Gautam Gambhir Team India: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रविवारी झालेल्या आशिया चषकाच्या फायनलमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने श्रीलंकेचा ५० धावांत गाशा गुंडाळला आणि त्यानंतर ६ षटकांत सामना जिंकला. भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा विजय आत्मविश्वास वाढवणारा आहे. या आधी २०११ साली भारतात वन डे विश्वचषक झाला होता, त्यात भारताने अंतिम सामना जिंकला होता. या सामन्यात गौतम गंभीर (९७) आणि महेंद्रसिंग धोनी (९१ नाबाद) दोघे हिरो ठरले होते. पण निवृत्तीनंतर गंभीरने धोनीवर सातत्याने टीका केल्याचे दिसून आले. असे असताना आता गंभीरने धोनीबद्दल नवे विधान केले आहे.

महेंद्रसिंग धोनी हा सुरूवातीपासून एक असा विकेटकिपर होता, जो आपल्या फलंदाजीने सामन्याची दिशा बदलून टाकण्यास सक्षम होता. धोनीच्या आधीचे विकेटकिपर्स हे किपिंगसाठी ओळखले जायचे आणि त्यांना बॅटिंगही जमत असे. पण धोनी हा मूळत: फलंदाज होता जो किपिंगही चांगली करायचा. त्यामुळे धोनीसारखा खेळाडू संघात असणे हे भारतीय क्रिकेटसाठी वरदानच होतं. धोनीच्या रूपाने भारताला एक असा खेळाडू मिळाला जो तुम्हाला सातव्या क्रमांकाला फलंदाजी करून सामने जिंकवून देईल, कारण त्याच्याकडे ते सामर्थ्य होतं." अशी स्तुती गौतम गंभीरने केली.

"धोनीने जर तिसऱ्या क्रमांकाला येऊन फलंदाजी केली असती तर त्याने नक्कीच वन डे क्रिकेटमधले अनेक विक्रम मोडीत काढले असते. भारतीय क्रिकेट चाहते धोनीच्या कर्णधारपदाचे गोडवे गात असतात, ते अगदी खरं आहे. पण मला असं वाटतं की धोनीने आपल्या कर्णधारपदासाठी आपल्यातील फलंदाजाचे बलिदान दिले. तो फलंदाजी आणखी बरेच विक्रम मोडू शकला असता, जे त्याला शक्य झाले नाहीत. असं त्याच वेळी घडतं जेव्हा तुम्ही एखाद्या संघाचे कर्णधार असता. कारण अशा वेळी तुम्ही स्वत:च्या आधी संघाचा विचार करता आणि तसे निर्णय घेता," असेही गौतम गंभीर म्हणाला.

टॅग्स :गौतम गंभीरमहेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघ