ठळक मुद्देभारताच्या महान कर्णधारांत कपिल देव, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी ही नावं आघाडीवरकर्णधार म्हणून गौतम गंभीरनेही आपला दबदबा सिद्ध केला आहे
मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महान कर्णधार झाले. यात कपिल देव, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी ही नावं आघाडीवर आहेत. या तिघांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवून दिले आणि त्याचे श्रेयही त्यांना मिळाले. मात्र, गौतम गंभीरला नेतृत्वकौशल्याची पोचपावती मिळाली नाही. कर्णधार म्हणून त्याची कामगिरी दुर्लक्षित राहिली. भारताच्या या सलामीवीराने मंगळवारी अचानक निवृत्ती जाहीर केली. गंभीरने सहा वन डे सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि त्यात एकही सामना त्याने गमावला नाही. 2010 च्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत धोनीच्या अनुपस्थितीत गंभीरला प्रथमच कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. त्याचवेळी त्याने नेतृत्व कौशल्याने संघाला पाचही वन डे सामन्यांत विजय मिळवून देत न्यूझीलंडवर निर्भेळ यश मिळवले. त्याने नेतृत्वाबरोबरच आपल्या कामगिरीनेही त्या मालिकेत छाप पाडली. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत त्याने 109.67 च्या सरासरीने सर्वाधिक 329 धावा चोपल्या. त्यात दोन नाबाद शतकांचा समावेश होता. त्यानंतर डिसेंबर 2011 मध्ये त्याच्या खांद्यावर पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी आली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या वन डे सामन्यात त्याने कर्णधारपद भूषवताना संघाला 34 धावांनी विजय मिळवून दिला. त्याने 41 चेंडूंत 31 धावा केल्या. त्याचे हे नेतृत्वगुण कोलकाता नाईट रायडर्स संघाने हेरले आणि इंडियन प्रीमिअर लीगच्या 2011च्या सत्रात त्याचा कर्णधाराची जबाबदारी दिली. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल जेतेपद पटकावले. 2012 मध्ये त्यांनी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा पाच विकेट राखून पराभव केला, तर 2014 मध्ये त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबचा 3 विकेट राखून पराभव केला. गंभीरने मंगळवारी फेसबुकवर भावनिक व्हिडीओ पोस्ट करून निवृत्ती जाहीर केली. त्याने 58 कसोटी आणि 147 वन डे सामन्यांत अनुक्रमे 4154 आणि 5238 धावा केल्या.