नवी दिल्ली : आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर भारतीय संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भिडत आहे. आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरूवात होत असून, सलामीचा सामना आज मोहाली येथे खेळवला जात आहे. ही मालिका दोन्हीही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची असेल. कारण मालिकेनंतर लगेचच भारतीय संघ आपल्या घरी नव्या अध्यायाचा सामना करणार आहे. ५ ऑक्टोबरपासून वन डे विश्वचषकाचा थरार रंगतो आहे. दहा वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी रोहितसेनेवर असेल. आगामी विश्वचषकाबद्दल अनेक जाणकार आपापली मतं मांडत आहेत. अशातच गौतम गंभीरने भारतीय संघाला एक मोलाचा सल्ला दिला आहे.
बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघ आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वांत मजबूत असल्याचे गंभीरने नमूद केले. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गंभीरने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. "ऑस्ट्रेलिया हा आयसीसी स्पर्धांमध्ये नेहमीच मजबूत संघ म्हणून समोर आला आहे. विश्वचषकाचा किताब पटाकावण्यासाठी भारतीय संघाला कांगारूंचा पराभव करावा लागेल. आम्ही त्यांना २००७ आणि २०११च्या विश्वचषकात पराभूत केले होते. त्यामुळेच ट्रॉफी जिंकणे शक्य झाले. त्यांना नॉकआउट सामन्यांमध्ये कशी कामगिरी करायची हे माहित आहे", असे गंभीरने सांगितले.
विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू