२०११च्या वर्ल्ड कप फायनलची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा चाहत्यांना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मारलेला षटकार डोळ्यासमोर उभा राहतो. एका षटकाराने भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला नाही, असे गौतम गंभीरने अनेक वेळा म्हटले आहे. त्याचं हे वक्तव्य पाहून चाहत्यांनी असा अंदाज बांधला की गंभीरला धोनीचा राग योते आणि म्हणूनच, जेव्हा गंभीर धोनीबद्दल काही सकारात्मक बोलतो, तेव्हा त्याचं चाहत्यांना आश्चर्य वाटतं. गंभीरने आता असेच विधान केले आहे, ज्यामुळे लोक खूप खूश झाले आहेत.
अलिकडे गंभीरने धोनीचे कौतुक केले होते. त्याने म्हटले होते की,'''जर धोनीने कारकिर्दीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती तर तो वन डे क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडू शकला असता. कर्णधार म्हणून त्याच्या कामगिरीबद्दल लोक नेहमी बोलतात, जे अगदी खरे आहे. पण मला वाटतं त्याच्या कर्णधारपदामुळे त्याने फलंदाजीत खूप त्याग केला. त्याला फलंदाजीत आणखी बरेच काही साध्य करता आले असते, जे त्याने केले नाही. जेव्हा तुम्ही कर्णधार असता तेव्हा हे घडते. कारण मग तुम्ही संघाला पुढे ठेवता आणि स्वतःला विसरता.''
''त्याने सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला सुरुवात केली. जर तो कर्णधार नसता तर तो भारताकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळत राहिला असता. आणि मला वाटते की तो त्याच्यापेक्षा जास्त धावा करू शकला असता आणि आणखी शतकेही करू शकला असता,''असेही गंभीर म्हणाला होता.
काल स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीर म्हणाला,''भारतीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. अनेक कर्णधार आले आणि भविष्यातही येतील पण धोनीच्या कर्णधारपदाची बरोबरी कोणी करू शकेल, असे मला वाटत नाही. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली ३ आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत, मला वाटत नाही की यापेक्षा चांगले काही असू शकते.