Gautam Gambhir, Team India World Cup: भारतीय संघाने नुकताच टी२० वर्ल्डकप जिंकला. या विजयानंतर भारताचे दिग्गज रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी टी२० मधून निवृत्ती जाहीर केली. आता त्यांच्या जागी नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्याशिवाय, भारताचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडचा देखील कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे त्याच्या जागी माजी सलामीवीर गौतम गंभीर पदभार स्वीकारणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. गौतम गंभीर हा आपल्या आक्रमकपणासाठी ओळखला जातो. पण त्याने एक अशी आठवण सांगितली ज्यात तो चक्क रात्रभर रडत होता.
कोणत्या खेळाडूला पाहून तुला क्रिकेट खेळण्याची इच्छा झाली, असा प्रश्न एका मुलाखतीत गौतम गंभीरला विचारला गेला. त्यावर बोलताना गंभीर म्हणाला, "कुठल्याही खेळाडूमुळे नव्हे तर एक सामना पाहिला तेव्हा मला भारतासाठी खेळायची आणि वर्ल्डकप जिंकायची इच्छा झाली. १९९२ साली ब्रिसबेन येथे भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरु होता. त्यात भारतीय संघ अवघ्या एक धावेने हरला होता. त्यानंतर मला खूप दु:ख झाले. मी ढसढसा रात्रभर रडत होतो. मी असा आधी कधीच रडलो नव्हतो आणि त्यानंतरही रडलो नाही. त्यादिवशी मला वाटलं होतं की आपण भारतासाठी खेळावं आणि वर्ल्डकप जिंकवून द्यावा," अशी आठवण गौतम गंभीरने सांगितली.
"मी ११ वर्षांचा होतो. मी रात्रभर रडलो. वेंकटपती राजू रन आऊट झाल्याने भारत एका धावेने हरला होता. मला आपला संघ जिंकायला हवा होता. भारताने वर्ल्ड कप जिंकावा असं मला खूप वाटत होतं. १९९२ साली मी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न मी २०११ मध्ये पूर्ण केलं," असेही गंभीर म्हणाला.
Web Title: Gautam Gambhir said on his World Cup dream as he said I have never cried like that before or after that Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.