रोहित शर्माने भारतात पार पडलेल्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद अतिशय शानदारपणे सांभाळले. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग १० सामने जिंकले, पण अंतिम फेरीत पराभवामुळे उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. आता आगामी २०२४ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी रोहितकडेच कर्णधारपद कायम राखण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनेही ( Gautam Gambhir) आपले मत मांडले आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी निवड होईलच, असे आश्वासन रोहितला देऊ शकत नाही - जय शाह
रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत गौतम गंभीरने ANI शी बोलताना सांगितले की, वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फक्त एकच सामना खराब खेळला, पण रोहितने खूप चांगली कामगिरी केली आहे. पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणे सोपे काम नाही. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे वर्चस्व होते आणि मी आधीच सांगितले होते की टीम इंडिया जिंकली की नाही, टीम इंडिया चॅम्पियनप्रमाणे खेळली की नाही हे महत्त्वाचे आहे. एक खराब सामना टीम इंडियाला वाईट संघ किंवा रोहित शर्माला वाईट कर्णधार बनवू शकत नाही. जर तुम्ही रोहितला वाईट कर्णधार म्हणत असाल तर ते योग्य नाही.
२०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितच्या कर्णधारपदाबाबत गंभीर म्हणाला की, जर रोहित शर्मा उत्कृष्ट फॉर्ममध्ये असेल आणि त्याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधारपद सांभाळावे. रोहित चांगला फॉर्ममध्ये नसेल तर त्याच्या जागी दुसरा कोणीतरी कर्णधार असावा. कर्णधारपद ही एक जबाबदारी आहे, ज्यासाठी तुम्हाला प्रथम स्वत:ला एक खेळाडू म्हणून सिद्ध करावे लागेल.