सध्या सुरू असलेला वन डे विश्वचषक बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे आहे. सलामीच्या सामन्यात यजमान भारताकडून पराभूत झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने देखील कांगारूंविरूद्ध हात साफ केले. क्विंटन डी कॉकने अप्रतिम शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला धुतले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी निराशाजनक राहिल्याने भारताचा माजी खेळाडू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीरने कमिन्सवर सडकून टीका केली. खरं तर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथने करायला हवे असे मत यावेळी गंभीरने मांडले.
सर्वाधिकवेळा विश्वचषक उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाची यंदाच्या पर्वातील कामगिरी पाहून चाहत्यांना देखील धक्का बसला. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यादरम्यान समालोचन करत असलेल्या गंभीरने देखील कांगारूंच्या कामगिरीवर आश्चर्य व्यक्त केले. यावरूनच त्याने कमिन्सची कर्णधारपदावरून हकालपट्टी करायला हवी असे म्हटले.
कमिन्सने केवळ कसोटी क्रिकेट खेळावे - गंभीर
"ऑस्ट्रेलियन संघ मजबूत आहे, पण सद्य स्थिती पाहता यावर विश्वास बसणार नाही. त्यामुळे मला वाटते की, स्टीव्ह स्मिथने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करावे. तसेच पॅट कमिन्सला या वन डे संघात स्थान द्यायला नको. त्याने केवळ लाल चेंडूचे क्रिकेट खेळणे सुरू ठेवावे." अर्थात कमिन्सने केवळ कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायला हवे, असा सल्ला गंभीरने दिला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाला आपल्या सलामीच्या सामन्यात भारताकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करून विजयाचे खाते उघडण्याचे आव्हान कांगारूंसमोर होते. पण, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना (३११) धावांचा डोंगर उभारून कमिन्सच्या संघाची डोकेदुखी वाढवली. आफ्रिकेने डीकॉकच्या १०९ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर ३१२ धावांचे तगडे लक्ष्य ठेवले.
Web Title: gautam gambhir said, Steve Smith should lead the Australian team in white ball cricket and Pat Cummins doesn't get a spot in this ODI XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.