नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) के.एल राहुलचे (KL Rahul) विशेष कौतुक केले आहे. तसेच राहुलने त्याच्या फलंदाजीत काही बदल करायला हवेत असा सल्लाही त्याने दिला. राहुल मागील महिन्यात झालेल्या झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत मोठ्या कालावधीनंतर खेळला होता. मोठा कालावधी क्रिकेटपासून लांब राहिल्यामुळे सध्या त्याला खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. झिम्बाब्वेच्या मालिकेत त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र त्याला साजेशी खेळी करण्यात यश आले नव्हते.
दरम्यान, हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यात राहुलने 39 चेंडूंत 36 धावांची सावध खेळी केली होती. राहुलच्या धीम्या खेळीवरून त्याच्यावर टीका होत असतानाच गौतम गंभीरने त्याची पाठराखण केली आहे. राहुलमध्ये टी-20 मध्ये चांगले प्रदर्शन करण्याची क्षमता अधिक असल्याचे गंभीरने म्हटले.
गंभीरने केली पाठराखण
गौतम गंभीरने म्हटले, "के.एल राहुलमध्ये खूप क्षमता आहे, खरं तर भारतीय कर्णधार रोहित शर्मापेक्षाही त्याच्यात जास्त क्षमता आहे आणि त्याला सिद्ध करण्याची गरजही नाही, असे स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीरने सांगितले. तसेच राहुलमध्ये भरपूर क्षमता आहे. या ड्रेसिंग रुममध्ये कदाचित त्याच्याकडे रोहित शर्मापेक्षा जास्त क्षमता आहे हे सांगायला मला अजिबात संकोच वाटणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. जर तो मोकळेपणाने खेळत नसेल तरच तो स्वतःला थांबवू शकतो. असे गौतम गंभीरने अधिक सांगितले.
39 चेंडूंत केल्या होत्या 36 धावाहॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यात के.एल राहुलने सावध खेळी केली होती. चेंडूप्रमाणे देखील धावा नसल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. 39 चेंडूंत अवघ्या 36 धावा करून त्याने लय पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला खेळपट्टीवर जास्त काळ टिकता आले नाही. मात्र राहुलचा टी-20 क्रिकेटमधील इतिहास पाहता तो एक घातक फलंदाज आहे. लवकरच तो त्याचे रौद्ररूप धारण करेल असा विश्वास गौतम गंभीरला आहे.