नवी दिल्ली : आयपीएल 2023 साठी मागील आठवड्यात झालेल्या मिनी लिलावात निकोलस पूरनला 16 कोटी रुपये मिळाले. त्याला लखनौ सुपर जायंट्सच्या फ्रँचायझीने मोठ्या किमतीत खरेदी केले. निकोलस पूरनची ट्वेंटी-20 मधील कामगिरी पाहता त्याला एवढ्या रकमेत खरेदी केले जाईल अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती. अनेक क्रिकेट एक्सपर्ट लखनौच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आपल्या निर्णयाचे समर्थन करत संघाचा प्लॅन सांगितला आहे.
जिओ सिनेपा ॲपवर बोलताना गौतम गंभीरने म्हटले, "मी मागील हंगामाकडे पाहत नाही. मी खेळाडूची क्षमता आणि प्रभाव पाहतो. ही स्पर्धा 500-600 धावा करण्यासाठी नाही. तो खेळाडू एका हंगामात तुम्हाला 2 ते 3 सामने जिंकूून देऊ शकतो. जर तुमच्याकडे असा खेळाडू असेल तर तुम्ही त्याच्याभोवती एक चांगला संघ तयार करू शकता."
गौतम गंभीरने सांगितला प्लॅन"मी फक्त एक हंगाम पाहून हा निर्णय घेतला नाही. निकोलस पूरन आम्हाला फार काळ साथ देऊ शकतो. या वयोगटातील (27-28) फार कमी खेळाडूंमध्ये ही क्षमता आहे. पूरन जसजसा खेळत जाईल तसतसे त्याचे प्रदर्शन सुधारत जाईल. मी नेहमी यावर विश्वास ठेवतो की रेकॉर्ड्स फक्त हेडलाईन बनवतात पण तुमचा प्रभाव सामना जिंकून देतो", असेही गंभीरने म्हटले.
16 कोटींचा निकोलस पूरनवर वर्षाव आयपीएल 2022 मधील खराब कामगिरीनंतर सनरायझर्स हैदराबादने मागील महिन्यात निकोलस पूरनला रिलीज केले होते. मागील आयपीएल मेगा लिलावात पूरन 10.75 कोटींना विकला गेला होता. आयपीएल 2022 मध्ये खराब कामगिरी असूनही यावेळी त्याची किंमत वाढली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"