नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने आले होते. ज्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला आणि मागील पराभवाचा वचपा काढला. किंग कोहलीने केलेल्या नाबाद ८२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने विजयी सलामी दिली. मात्र विश्वचषक सुरू होण्याच्या आधीच बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात वाद रंगला होता तो आजतागायत सुरू आहे. खरं तर बीसीसीआय सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी पाकिस्तानात होणाऱ्या आशिया चषकाच्या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्याची त्यांनी मागणी केली.
दरम्यान, बीसीसीआयने ही मागणी करताच पीसीबीने एक लांबलचक पत्रक काढून बीसीसीआयवर निशाणा साधला. याशिवाय आशियाई संघटनेने तातडीने एक बैठक बोलवावी अशी मागणी केली. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्या वादात भारत-पाकिस्तान दोन्ही देशातील माजी खेळाडूंनी उडी घेतली. भारत आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात आला नाही तर भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आम्ही बहिष्कार टाकू असे पीसीबीने म्हटले आहे. यावरच आता भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने सडकून टीका केली आहे. गंभीरने झी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.
भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊ नये "मी इथे एक क्रिकेटर किंवा राजकारणी म्हणून बोलत नाही, तर एक भारतीय नागरिक म्हणून बोलत आहे. मला वाटते की जोपर्यंत आपल्या सीमेवरील जवान सुरक्षित नाही तोपर्यंत भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी जाऊ नये". अशा शब्दांत गौतम गंभीरने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषकात भारतीय संघाने सहभागी न होता तटस्थ ठिकाणी खेळावे असे म्हटले आहे.
खरं तर २०२३ मधील आशिया चषकाची स्पर्धा पाकिस्तानच्या धरतीवर खेळवली जाणार आहे. मात्र आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून पीसीबीने आगामी २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानातील सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
२०२३ मध्ये होणाऱ्या प्रमुख स्पर्धा
- - आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका
- - आयसीसी १९ वर्षांखालील मुलींची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका
- - आशिया चषक २०२३, पाकिस्तान
- - आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"