भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हार मानावी लागली. २०११ नंतर भारतीय संघ पुन्हा वर्ल्ड कप जिंकेल असे तमाम भारतीयांचे स्वप्न भंगले. रोहित शर्माला वर्ल्ड कप जिंकता न आल्याची खंत मनात सलत आहे. पण, हा पराभव विसरून भारतीय संघ २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीच्या सुरुवातीला लागला आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या ट्वेंटी-२० कारकीर्दिचा निर्णय हा बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंवर सोपवला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता अधिक आहे. पण, नेहमीच आपल्या सडेतोड विधानाने चर्चेत असलेल्या गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) हार्दिकच्या कॅप्टन्सीला विरोध केला आहे आणि रोहित व विराट यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या मेंटॉरपदी नव्याने नियुक्त झालेल्या गौतम गंभीरने रोहित शर्मा व विराट कोहली यांनी २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. रोहितच्या ट्वेंटी-२० कारकीर्दिबाबत निवड समितीने हिटमॅनशी संपर्क साधला असल्याच्या चर्चा आहेत. निवड समितीला युवा खेळाडूंची फळी तयार करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळायचा आहे. पण, गौतम गंभीरनं यावर मत वेगळे आहे.
गौतम म्हणाला,''विराट कोहली व रोहित शर्मा यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ खेळायला हवा. हार्दिक पांड्याला कर्णधारपद द्यायला नको आणि रोहितला फलंदाज म्हणून खेळवू शकत नाही. तो चांगला लिडर आहे आणि तुम्हाला फलंदाजीच्या फळीत अनुभव हवा आहे.''
पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रम यांनीही गौतमच्या मताशी सहमती दर्शवली. ते म्हणाले, ही दोघं खूप मोठे खेळाडू आहेत आणि त्यांच्याशिवाय फक्त युवा खेळाडूंना घेऊन तुन्हा वर्ल्ड कपमध्ये जाऊ शकत नाही. विराट व रोहित यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि ते त्याचे हकदार आहेत.
विराट कोहली व रोहित शर्मा हे २०२२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध शेवटचे खेळले होते. त्यानंतर ते ट्वेंटी-२० क्रिकेटपासून दूर आहेत.