Gautam Gambhir On IND vs PAK: क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच... हा सामना पाहण्यासाठी अवघे क्रिकेट विश्व आतुर असते. केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान हा थरार पाहायला मिळतो. पण, आता भारत आणि पाकिस्तान या सामन्याची क्रेझ राहिली नसल्याचा दावा भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने केला आहे. या सामन्यात पूर्वीसारखा रस राहिला नसून, त्याची जागा भारत आणि ऑस्ट्रेलिया या लढतीने घेतली असल्याचे गंभीरने नमूद केले.
गौतम गंभीरने सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना एकतर्फी होतो. टीम इंडिया आरामात विजय मिळवते अन् सातत्याने शेजाऱ्यांचा दारूण पराभव होत आला आहे. हा सामना एकतर्फी होत असल्याने मोठ्या प्रमाणात चाहते याकडे दुर्लक्ष करतात. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा दबदबा आहे, तुलनेने पाकिस्तानी संघ टीम इंडियाच्या खूप मागे आहे. जर पाकिस्तानने आताच्या घडीला भारताला पराभूत केले तर तो मोठा उलटफेर मानला जातो. त्यामुळे मला वाटतो की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चांगली लढत होते, जी चाहत्यांना आकर्षित करते आणि मनोरंजन करते. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी कोण असे विचारल्यास कोणीही सांगेल की, पाकिस्तान नसून ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. गंभीर स्टार स्पोर्ट्सवर बोलत होता.
भारत पाकिस्तानला आरामात पराभूत करतो - गंभीर वन डे विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. पण, अंतिम सामन्यात कांगारूंचा संघ आपल्याला भारी पडला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताने सलग दहा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली होती. टीम इंडियाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारूण पराभव केला होता. या आधी आशिया चषकात देखील शेजाऱ्यांना भारताकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. भारताने ऑस्ट्रेलियाला नमवून विश्वचषकात विजयी सलामी दिली पण अखेरच्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने पराभवाचा वचपा काढत सहाव्यांदा विश्वचषक उंचावला.
...अन् ऑस्ट्रेलियाने उंचावला विश्वचषक भारताचा विजय रोखत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक उंचावला. अंतिम सामन्यात नाणेफेकिचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला होता. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले. विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला.