नवी दिल्ली : महान खेळाडूच्या कारकिर्दीची अखेर दमदार व्हावी, असे त्याच्या चाहत्यांना वाटत असते. पण बऱ्याच खेळाडूंना अखेरच्या सामन्यात नेत्रदीपक कामगिरी करायला जमत नाही. या गोष्टीला अपवाद ठरला आहे तो म्हणजे गौतम गंभीर. कारण आंध्र प्रदेशविरुद्धच्या अखेरच्या रणजी सामन्यात गंभीरने शतक झळकावले आहे.
गंभीरने 4 डिसेंबरला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी आंध्र प्रदेशविरुद्ध आपला हा अखेरचा सामना असेल, असे त्याने सांगितले होते.
आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्या दिल्लीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. आंध्र प्रदेशने पहिल्या डावात 390 धावा केल्या. यानंतर दिल्लीच्या संघाची फलंदाजीची वेळ आली. गंभीर जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा त्याला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला होता.
गंभीरने अखेरच्या सामन्यातही आपले नाणे खणखणीत वाजवले. गंभीरने 185 चेंडूंमध्ये 10 चौकारांच्या जोरावर 112 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली.