Gautam Gambhir Speech as LSG Mentor, IPL मध्ये काल रात्री गुजरात आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात गुजरात संघाने सहज विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असल्याने त्यांना या पराभवामुळे फार मोठा फटका बसला नाही. पण गुजरातसमोर ज्याप्रकारे लखनौचा पराभव झाला, त्यामुळे कर्णधार लोकेश राहुल आणि त्याच्या संघाची चांगलीच नाचक्की झाली. या पराभवानंतर संघाचा मेंटॉर गौतम गंभीर चांगलाच संतापल्याचे दिसून आले. त्याचा ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
गौतम गंभीर हा आपल्या संघाबाबत कायमच आक्रमक असतो. टीम इंडिया असो किंवा कोवकाताचा नाईट रायडर्स असो, तो जेव्हा संघात खेळायचा तेव्हा तो मैदानावर बऱ्यापैकी आक्रमक असायचा. तोच स्वभाव आता मार्गदर्शक झाल्यावरही दिसून येत आहे. CSK विरूद्धच्या सामन्यात जेव्हा LSG ला थरारक विजय मिळाला होता, तेव्हा गौतम गंभीरने अक्षरश: जल्लोष केला होता. त्याचीही चांगलीच चर्चा झाली आहे. त्यानंतर कालच्या पराभवानंतर गंभीरच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या भाषणादरम्यान, गंभीर चांगलाच संतापल्याचे दिसून आले.
गौतम गंभीर काय म्हणाला ऐका Video-
"खेळ म्हंटला की विजय-पराजय सुरूच असतो. त्यामुळे तुम्ही पराभूत झालात याची चिंता नाही. एखाद्या संघात पराभव होणे ही गोष्ट वाईट नाही. पण लढणं सोडून देणं किंवा हत्यार टाकून परिस्थितीला शरण जाणे हे खूप वाईट आहे. असं घडणं अपेक्षित नाही. आपण आतापर्यंत या हंगामात कित्येक मोठ्या संघांना पराभूत केलं आहे. पण आज आपलं काय चुकलं ते पाहायला हवं. आज तुम्ही खेळाचा अंदाज घ्यायला चुकलात. IPL सारख्या स्पर्धेत दुर्बल असणं चालत नाही. त्यामुळे खेळात सुधारणा करायलाच हवी", असा मोलाचा सल्ला गौतम गंभीरने दिला.