नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा इंग्लंडकडून दारूण पराभव झाला. या पराभवासोबतच भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. 4 साखळी सामने जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र उपांत्य फेरीत काल इंग्लिश संघाने भारताचा 10 गडी राखून मोठा पराभव केला. भारताने दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लिश संघाने केवळ 16 षटकांत पूर्ण केला. या विजयासह इंग्लिश संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. फायनलचा सामना 13 तारखेला पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर अनेक माजी खेळाडू संघावर प्रश्न उपस्थित करत आहेत.
दरम्यान, भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने एक मोठे विधान केले आहे. माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीचे कौतुक करून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर सडकून टीका केली आहे. 41 वर्षीय गौतम गंभीर 2007 टी-20 विश्वचषक आणि 2011च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघांचा भाग होता, ICC स्पर्धांमध्ये त्याने भारताचा माजी कर्णधार धोनीचे कौतुक केले आहे. धोनीशिवाय कोणताच भारतीय कर्णधार आयसीसीच्या 3 ट्रॉफी जिंकू शकेल असे मला वाटत नाही असे गंभीरने म्हटले आहे.
रोहित-विराटवर साधला निशाणा रोहित-विराटवर टीका करताना गंभीरने म्हटले, "भविष्यात कोणीतरी येईल आणि कदाचित रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा जास्त शतके झळकावेल. परंतु मला वाटत नाही की कोणताही भारतीय कर्णधार तीन आयसीसी ट्रॉफी मिळवू शकेल," असे गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हटले.
धोनी सर्वात यशस्वी कर्णधार - गंभीर खरं तर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्या नेतृत्वात भारताने टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. कर्णधार म्हणून तीनही ICC ट्रॉफी जिंकणारा क्रिकेट इतिहासातील एकमेव कर्णधार म्हणून धोनीची ओळख आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सत्रात पाकिस्तानचा 5 धावांनी तर 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला होता. याशिवाय 2013च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारताने इंग्लंडचा पाच धावांनी पराभव करून किताब पटकावला होता.
हेल्स-बटलरसमोर भारतीय गोलंदाज गारद 2022च्या टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने 10 गडी राखून सहज विजय मिळवला. भारताकडून विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांना एकही बळी पटकावता आला नाही. अखेर इंग्लिश संघाने 16 षटकांतच 169 धावा करून फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडकडून सलामीवीर कर्णधार जोस बटलर आणि 80 तर ॲलेक्स हेल्स यांनी अनुक्रनमे 80 आणि 89 धावांची नाबाद खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"