Virat Kohli, Gautam Gambhir, IND vs SA 3rd Test : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या कसोटीसाठी पुन्हा संघात आला. दुसऱ्या कसोटीत तो दुखापतीमुळे खेळला नव्हता. पण पहिल्या कसोटीत विराट दोन्ही वेळा ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर बाद झाला होता. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत विराटने कव्हर ड्राइव्हचा मोह टाळावा असा सल्ला त्याला बड्या बड्या खेळाडूंनी दिला. पण माजी सलामीवीर गौतम गंभीरने मात्र या सल्ल्यांचा चांगलाच समाचार घेतला.
"जर एखादा खेळाडू कट शॉट खेळून बाद होत असेल तर त्याला तो शॉट खेळण्यापासून रोखू नये. स्ट्रेट ड्राइव्ह खेळतानाही फलंदाज बाद होतो. पण त्यावेळी त्याला तो शॉट खेळण्यापासून रोखलं जात नाही. मग कव्हर ड्राइव्ह खेळणं बंद करायला का सांगितलं जातं? रोहित शर्मा आखूड टप्प्याच्या गोलंदाजीवर पुल शॉट खेळताना बाद झाला आणि त्याला तोच शॉट खेळण्यापासून तुम्ही रोखायला सुरूवात केलीत तर मग फलंदाजाने धावा बनवायच्या कशा? मला असं वाटतं की विराटने आपले पसंतीचे शॉट्स खेळत राहायला हवं. फक्त त्याने योग्य चेंडू पाहून ते शॉट्स खेळावेत", असं रोखठोक मत गौतम गंभीरने व्यक्त केलं.
विराट कोहलीने गेल्या २ वर्षात एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावलेलं नाही. यावरूनही गंभीरने विराटची बाजू घेतली. "भारतात खेळाडूची उपयुक्तता त्याने केलेल्या शतकांवरून ठरवली जाते. अशा लोकांना मला सांगावंसं वाटतं की एखादा खेळाडू जर ९९ धावांवर बाद होत असेल पण संघ जिंकत असेल तर त्या ९९ धावांचं महत्त्व शतकापेक्षाही मोठं असतं. कारण खेळाडूने नक्की कोणत्या परिस्थितीत त्या धावा केल्या आहेत हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं", असंही गौतम गंभीर म्हणाला.