मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरला शनिवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. सोशल मीडियावर सामाजिक व राजकीय मुद्यांवर सडकून टीका करणाऱ्या गंभीरनं पुरस्कारानंतर ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. त्याने पत्नीसह फोटो शेअर करताना सर्वांचे आभार मानले, परंतु या ट्विटमध्ये त्याने आपल्या टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले.
तो म्हणाला,''हा पुरस्कार भारतीय क्रिकेटला समर्थन करणाऱ्या आणि टीका करणाऱ्या प्रत्येकाचा आहे. दोघांनी माझ्या आयुष्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. माझ्या यशात नेमका कोणाचा किती वाटा हे वेळ आल्यावर सांगेन.''
गंभीरने 2003 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिेकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या नावावर 10000 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता.