भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने राहुल द्रविड याच्या प्रशिक्षकाच्या कार्यकाळाचे कौतुक केले. द्रविडला यशस्वी प्रशिक्षक म्हणून म्हणताना गंभीरने यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचे कान टोचले. त्याने रोहितला आठवण करून दिली की संघाला देशासाठी वर्ल्ड कप जिंकायचा असतो आणि कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी नाही. भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या भविष्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर गंभीरने प्रतिक्रिया दिली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर प्रशिक्षक म्हणून द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे आणि तो पुन्हा करार करण्याची शक्यता कमी आहे.
आयसीसी स्पर्धांमध्ये राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने दोन फायनल आणि सेमीफायनलपर्यंत धडक दिली, परंतु भारताचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपुष्टात आणण्यात तो अपयशी ठरला पण द्विपक्षीय सामन्यांमध्ये त्याने मोठे यश मिळवले. भारत सध्या तिन्ही फॉरमॅटच्या आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. द्रविडला मुख्य प्रशिक्षक म्हणून राहायचे असेल तर त्याच्या कराराचे नूतनीकरण नक्कीच केले पाहिजे, असे गंभीर म्हणाला. "मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या कराराचे आपोआप नूतनीकरण व्हायला पाहिजे. संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने उल्लेखनीय खेळ केला. पण, जर तुम्ही प्रशिक्षकाला फक्त एका सामन्याने न्याय देणार असाल तर ते चुकीचे उदाहरण ठरेल," असे तो स्पोर्ट्सकीडावर म्हणाला.
भारताच्या माजी सलामीवीराने मात्र वर्ल्ड कप फायनलपूर्वी रोहितच्या वक्तव्यावर आक्षेप व्यक्त केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित म्हणाला होता की, संघाला मुख्य प्रशिक्षक द्रविड यांच्यासाठी आणि त्याने खेळाडूंच्या भल्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी ट्रॉफी जिंकायची आहे. कठीण काळात तो ज्या प्रकारे खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिला, विशेषत: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील पराभवानंतर...
रोहितने मीडियासमोर असे वक्तव्य करायला नको होते, असे गंभीर म्हणाला. माजी सलामीवीराने २०११ च्या वर्ल्ड कपचे उदाहरण दिले, जेथे अनेक भारतीय खेळाडूंनी उघडपणे सांगितले की त्यांना सचिन तेंडुलकरसाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे.
"प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक प्रशिक्षकाला वर्ल्ड कप जिंकायचा आहे. जर द्रविडला करारात वाढ हवी असेल तर त्याला ती संधी नक्कीच द्यायला हवी. मला एक गोष्ट कधीच समजणार नाही, २०११ मध्येही आमच्या काळात असे घडले होते. जेव्हा तुम्ही तुम्हाला वर्ल्ड कप एखाद्या व्यक्तीने जिंकायचा आहे असे म्हणता, तो कोण आहे हे महत्त्वाचे नाही... हे विधान योग्य नाही,''असे गंभीर म्हणाला.
त्याने पुढे म्हटले की, तुम्ही संपूर्ण देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला असे काही सांगायचे असेल तर ते मीडियामध्ये बोलू नका. ते तुमच्यातच ठेवा. सत्य हे आहे की, राष्ट्रासाठी वर्ल्ड कप जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे. २०११ मध्ये मला हेच विचारण्यात आले होते, जेव्हा सर्वांनी सांगितले होते, की आम्ही एका व्यक्तीसाठी वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न करत आहोत, तेव्हा मी म्हणालो नाही मला माझ्या देशासाठी चषक जिंकायचा आहे. मी माझ्या देशासाठी बॅट उचलली.