Gautam Gambhir vs Virat Kohli Rohit Sharma, Team India : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावल्यानंतर, BCCI ने शनिवारी आढावा बैठक घेतली. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनीही यात सहभाग घेतला. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आता रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, गौतम गंभीर संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या मागण्यांबाबत नाराज आहे. कोणत्याही एक विशिष्ट खेळाडूचे नाव समोर आलेले नाही, पण सुरु असलेल्या ते वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली असल्याची चर्चा आहे.
गंभीरची नाराजी
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात असल्यापासूनच संघात मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. पर्थ कसोटीतील विजयानंतर खेळाडू वेगवेगळे फिरताना दिसले आणि त्यांनी एकत्र विजय साजरा केला नाही. मेलबर्न कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील चर्चा बाहेर आल्या. आता पुन्हा एकदा भारतीय संघाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सीनियर खेळाडूंनी ऑस्ट्रेलियातील सरावाची वेळ आणि हॉटेलशी संबंधित काही खास मागण्या केल्या होत्या. एका सूत्राने सांगितले की, गौतम गंभीर हा सुपरस्टार संस्कृती संपवण्यासाठी आला आहे आणि यामुळे काही खेळाडूंना अडचणी येत आहेत. दुसरीकडे निवड समितीही गंभीरवर खूश नाही. गंभीरने संघनिवडीशी संबंधित बाबींपासून दूर राहावे, अशी निवड समितीची इच्छा आहे.
एक माजी निवडकर्ता म्हणाला- गंभीरमध्ये चॅपलची झलक
एका माजी निवडकर्त्याने गौतम गंभीरची तुलना टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चेल यांच्याशी केली आहे. माजी निवडकर्ता म्हणाला, "एकतर तुम्ही रवी शास्त्रीसारखे मीडिया फ्रेंडली राहा आणि खेळाडूंना सुखावणारी प्रतिमा देणारी विधाने करत राहा किंवा राहुल द्रविड, गॅरी कर्स्टन आणि जॉन राईटसारखे गप्प राहा. तुमचे काम करा आणि खेळाडूंना प्रसिद्धी द्या. चॅपल २००५ ते २००७ पर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या कार्यकाळात भारतीय खेळाडूंसोबतचे त्यांचे वाद चर्चेत होते. चॅपलची पद्धत भारतात चालणार नाही."