US Master T10 League: क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार करण्याचे ध्येय ICC ने घेतले आहे. अमेरिकेसारख्या मोठ्या देशातही आता क्रिकेट हळूहळू रुजताना दिसत आहे. गेल्या महिन्यात मेजर लीग क्रिकेटचा (एमएलसी) पहिला हंगाम तेथे झाला. ज्यामध्ये एमआय न्यूयॉर्कने विजेतेपदाच्या सामन्यात सिएटल ऑर्कासचा 7 गडी राखून पराभव केला. नुकतेच अमेरिकेच्या भूमीवर भारत आणि वेस्ट इंडिज चे दोन टी-२० सामनेही खेळले गेले. इतकंच नव्हे तर पुढील वर्षी वेस्ट इंडिजसोबतच अमेरिकेतही टी-20 विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. याचदरम्यान, भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा दमदार फलंदाज शाहिद आफ्रिदी या दोघांमधील मैदानावरील टशन पुन्हा दिसून येणार आहे.
यूएस मास्टर टी 10 लीग अमेरिकेत सुरू होणार आहे. या लीग स्पर्धेत जुने दिग्गज पुन्हा एकदा एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या संघाला अनेक सामने जिंकून देणारे दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा अमेरिकेच्या भूमीवर अँक्शन मोडमध्ये दिसतील. या लीगमध्ये गौतम गंभीर, जॅक कॅलिस, ख्रिस गेल, रॉस टेलर, सुरेश रैना, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग, युसूफ पठाण असे दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत. या सर्व खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, हे खेळाडू यूएस मास्टर T10 लीग मध्ये खेळणार आहेत
यूएस मास्टर T10 लीग कधी, कुठे? संघ किती?
ही लीग T10 ग्लोबल स्पोर्ट्स आणि सॅम्प आर्मी क्रिकेट फ्रँचायझीद्वारे आयोजित केली जात आहे. यूएस मास्टर T10 लीगपूर्वी, त्यांनी अबू धाबी T10, इंडियन मास्टर T10, श्रीलंका T10 लीग देखील आयोजित केली आहे. यूएस मास्टर टी10 लीगमध्ये 10-10 षटकांचे सामने खेळवले जातील. ही लीग 18 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान अमेरिकेच्या भूमीवर खेळवली जाईल. या लीगचे सर्व सामने फ्लोरिडाच्या मैदानावर खेळवले जातील. या लीगमध्ये एका दिवसात 3 सामने खेळवले जातील. भारतीय वेळेनुसार पहिला सामना संध्याकाळी 6:30 वाजता, दुसरा सामना 8:45 वाजता आणि तिसरा सामना 10:45 वाजता खेळवला जाईल. सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर होणार आहे.