Gautam Gambhir Supporting Staff Team India: भारतीय क्रिकेट संघालागौतम गंभीरच्या रूपाने नुकताच नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला. अलीकडेच टीम इंडियाला T20 विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या राहुल द्रविडची जागा त्याने घेतली. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या सपोर्टिंग स्टाफमध्ये कोणकोणत्या चेहऱ्यांचा समावेश होणार यावर अद्याप चर्चा सुरु आहे. याचदरम्यान एका सुत्राच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला आपल्या कोचिंग स्टाफमध्ये एका परदेशी खेळाडूचा समावेश करायचा आहे. तशी मागणी त्याने BCCIकडे केली आहे.
गंभीरने BCCI समोर ठेवली मोठी मागणी
क्रिकबझच्या वृत्तानुसार, गौतम गंभीर नेदरलँडचा माजी क्रिकेटर रायन टेनडेस्कॉशे (Ryan ten Doeschate) याला संघाच्या सपोर्टिंग स्टाफमध्ये समाविष्ट करू इच्छितो. ही मागणी गंभीरने बीसीसीआयसमोर ठेवली आहे. मात्र, अंतिम निर्णय बीसीसीआयच घेईल असे सांगितले जात आहे. बीसीसीआयने काही काळापासून टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये भारतीयांना प्राधान्य दिले आहे. अशा परिस्थितीत गंभीरची ही मागणी पूर्ण होईल की नाही याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे.
IPL 2024 मध्ये एकत्र काम
गौतम गंभीरने IPL 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी रायन टेनडेस्कॉशे सोबत काम केले. संघाला चॅम्पियन बनवण्यात रायन याचाही महत्त्वाचा वाटा होता. तो संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होता. याशिवाय त्याने कॅरिबियन प्रीमियर लीग, मेजर लीग क्रिकेट आणि ILT20 मध्ये KKRच्या इतर संघांसोबत काम केले आहे. अशा परिस्थितीत, त्याच्याकडे कोचिंग अनुभवाची कमतरता नाही. दुसरीकडे, अशाही बातम्या येत आहे की, बीसीसीआय टी दिलीपला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम ठेवू इच्छित आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रायनला सहाय्यक प्रशिक्षक म्हणून आणले जाऊ शकते.
२०२१ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
२०२१ च्या T20 विश्वचषकानंतर रायनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या रायनने नेदरलँड्स कडून ३३ एकदिवसीय आणि २४ T20 सामने खेळले. त्याने वनडेमध्ये १,५४१ आणि T20 मध्ये ५३३ धावा केल्या आहेत. या काळात त्याने एकूण ५ शतकेही झळकावली. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ६८ विकेट्स घेतल्या. रायन २०११ ते २०१५ या कालावधीत IPL मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडूनही खेळला. तो २०१२ आणि २०१४ मध्ये KKR च्या चॅम्पियन टीमचा भाग होता.
Web Title: Gautam Gambhir wants BCCI to hire Netherlands Ryan Ten Doeschate to Team India coaching staff
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.