भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Gambhir) हा नेहमी चर्चेत राहणारा सेलिब्रेटी आहे. त्याचे सडेतोड बोलणे हे अनेकवेळा याच चर्चेचं कारण असते. माजी क्रिकेटपटू गंभीर सध्या भाजपाचा खासदार आहे. सध्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर गंभीरने स्पष्टिकरण दिले होते. आज त्याचा नवा दावा समोर आला आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये गंभीरचे योगदान मोठे आहे. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०११च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील त्याची कामगिरी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. त्याने इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्सचे कर्णधारपदही भूषवले आणि संघाला दोन वेळा विजेतेपद मिळवून देण्यास मदत केली.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत या दिग्गज क्रिकेटपटूला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पश्चातापाबद्दल विचारण्यात आले. मी क्रिकेटर व्हायला नको होतं, असे म्हणत गंभीरने धक्कादायक उत्तर दिले. बडा भारत टॉक शो सीझन 2 दरम्यान बोलताना फलंदाजाने सांगितले की, "मी क्रिकेटर व्हायला नको हवं होतं." गंभीरने त्याच्या उत्तरामागील कारण स्पष्ट केले नाही.
शुभमन गिल, तिलक वर्मा आणि यशस्वी जैस्वाल या युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय कामगिरीचे गंभीरने कौतुक केले. गंभीरला नजीकच्या भविष्यात सुपरस्टार बनण्याची क्षमता असलेल्या एका तरुण क्रिकेटचे नाव विचारले असता, त्याने अनुभवी लेगस्पिनर रवी बिश्नोईला निवडले.