क्रिकेटपटू, राजकारणी आणि मेंटॉर अशी कारकीर्द राहिलेल्या गौतम गंभीरची नवी इनिंग सुरू झाली आहे. गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेपासून गंभीर या पदाचा कारभार सांभाळेल. येत्या २७ जुलैपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात वन डे आणि ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाईल. अलीकडेच भारतीय संघाने विश्वचषक जिंकून कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी विराट कोहली आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा या त्रिकुटाला ट्वेंटी-२० मधून निरोप दिला. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय शिलेदारांना धडे देण्याची प्रमुख जबाबदारी गौतम गंभीरच्या खांद्यावर असेल. गंभीरला मुख्य प्रशिक्षक बनताच त्याच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली.
गौतम गंभीरची पत्नी नताशा जैनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली. यामाध्यमातून तिने पती गौतम गंभीरचे अभिनंदन केले. तिने गंभीरसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की, टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी तो पात्र आहे.
गौतम गंभीरची प्रतिक्रिया..."भारत ही माझी ओळख आहे. माझ्या देशाची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी भाग्यच आहे. खेळाडू म्हणून खेळल्यानंतर आता कोचच्या भूमिकेत मला पुन्हा एकदा देशसेवा करण्यासाठी संधी मिळाली हा माझा सन्मान आहे. आता मी खेळाडूची नव्हे तर कोचची टोपी घालून ड्रेसिंग रुममध्ये दिसेन. पण टीम इंडियाचा विजय आणि देशाला गर्व वाटावी अशी कामगिरी हेच माझे पुन्हा एकदा लक्ष्य असेल. भारतीय क्रिकेट संघाच्या खांद्यावर नेहमीच १४० कोटी भारतीयांची स्वप्ने असतात. ही स्वप्ने पूर्ण करण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करेन", अशा भावना गंभीरने टीम इंडियाच्या हेड कोच पदी नियुक्ती झाल्यावर व्यक्त केल्या.
दरम्यान, २००७ आणि २०११ च्या टीम इंडियाच्या विश्वविजेतेपदांमध्ये गंभीरने मोलाची भूमिका बजावली होती. दोनही फायनलमध्ये गंभीरने सर्वाधिक धावा केल्या होत्या. आता गौतम गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्याने त्याआधीच बीसीसीआयकडून नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला होता. त्यात गौतम गंभीरचे नाव आघाडीवर होते. तसेच, भाजपाकडून २०१९ ते २०२४ या काळात खासदार असलेला गंभीर, यावेळची लोकसभा निवडणुक लढला नव्हता. कोलकाता संघाला मेंटॉर म्हणून IPL 2024 जिंकवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आज अखेर त्याच्या नावाच अधिकृत घोषणा झाली.