नवी दिल्ली, दि. 5 - भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर सोशल मीडियावरून आक्रमकपणे देशभक्तीचे धडे देत असतो. देशाचे रक्षण करताना शहीद होणारे जवान, पोलीस यांच्याबाबत कळकळीने आपल्या भावना मांडत असते. मात्र गंभीरची ही कळकळ केवळ सोशल मीडियापुरतीच मर्यादित नाही आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही तो वेळोवेळी मदत करत असतो. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले अब्दुल रशीद यांच्या मुलीच्या शिक्षणासाठीही गंभीरने पुढाकार घेतला आहे. रशीद यांची मुलगी जोहराच्या शिक्षणाचा खर्च आपण उचलणार असल्याचे गौतम गंभीरने ट्विटरवरून जाहीर केले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक पदावर तैनात असणारे अब्दुल रशीद हे अनंतनाग येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले होते. त्यांची लहान मुलगी जोहराच्या आक्रोष करतानाच्या छायाचित्राने संपूर्ण देशातील समाजमनाचे डोळे पाणावले होते. दरम्यान, या जोहराचे सांत्वन करून तिला मदतीचा हात देण्यासाठी गौतम गंभीर पुढे सरसावला आहे. ट्विटरवरून जौहराचे सांत्वन करताना तो म्हणतो, जौहरा मी तुझ्यासाठी अंगाई गीत गाऊ शकत नाही, पण तुझी स्वप्ने साकार करण्यासाठी मदतीचा हात नक्कीच देऊ शकतो. तुझ्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च मी करणार आहे."
वडीलांच्या निधनामुळे शोकसागरात बुडालेल्या जोहराचे दक्षिण काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक एस. पी. पाणी यांनीही पत्र लिहून सांत्वन केले आहे. तुझ्या वडलांचे बलिदान कायम स्मरणात राहील, असे त्यांनी म्हटले आहे. ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता ते ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता ते मानवतेचे शत्रू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गौतम गंभीरने याआधी सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची जबाबदारी उचलली होती. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून आपण मदत करणार असल्याचे गंभीरने जाहीर केले होते. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दुस-या दिवशी वृत्तपत्रांमध्ये आलेले फोटो पाहून गंभीरला भावना अनावर झाल्या. वृत्तपत्रात शहीद झालेल्या दोन जवानांच्या मुलींचा फोटो छापण्यात आला होता. आपल्या वडिलांच्या मृत्यूने हादरलेल्या या मुलींचा फोटो पाहून गंभीरला आपली त्यांच्याप्रती जबाबदारी असल्याची जाणीव झाली. एक मोठा खड्डा आपल्याला भरुन काढायचा असल्याची जाणीव झाल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला होता.
Web Title: Gautam Gambhir, who runs for help in the family of Shahid, will take the girl's education expenditure
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.