Indian Cricket Team Head Coach : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज देखील मागवले आहेत. विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. गौतम गंभीरपासून स्टीफन फ्लेमिंग यांची नावे चर्चेत आहेत. अशातच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने या पदासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे. माहितीनुसार, गौतम गंभीरने अद्याप प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला नाही. जूनमध्ये होणारा ट्वेंटी-२० विश्वचषक संपताच भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत.
आताच्या घडीला गंभीर आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा मार्गदर्शक आहे. गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने दोनवेळा आयपीएल जिंकण्याची किमया साधली. आता त्याच्या मार्गदर्शनाखाली संघाने अंतिम फेरी गाठली आहे. गौतम गंभीर आणि केकेआरच्या संघाचा मालक शाहरूख खान याचे चांगले संबंध आहेत. गंभीरने आणखी काही वर्षे केकेआरच्या संघासोबत राहावे या विचाराचा शाहरूख आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गंभीर लखनौ सुपर जायंट्ससोबत असताना शाहरूखने त्याला केकेआरमध्ये येण्यासाठी त्याच्याशी चर्चा केली होती.
दरम्यान, 'दैनिक जागरण'ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, गौतम गंभीरने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरून केकेआरचा मालक शाहरूख खानशी चर्चा केली नाही. जर तो या पदासाठी अर्ज करणार असेल तर नक्कीच शाहरूखचे मत विचारात घेईल. कारण की, गौतम गंभीरने पुढच्या १० वर्षांपर्यंत केकेआरच्या फ्रँचायझीसोबत राहावे असे शाहरूखला वाटते.
BCCI च्या प्रशिक्षकपदासाठी अटी -
- नवीन प्रशिक्षक हा १ जुलै, २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या काळासाठी असणार आहे.
- प्रशिक्षक पदासाठी उच्छुक उमेदवाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.
- कमीतकमी ३० कसोटी, ५० वनडे सामने खेळण्याचा अनुभव असावा तसेच कमीतकमी दोन वर्षांचा एखाद्या पूर्णवेळ संघाचा प्रशिक्षक पदाचा अनुभव असावा.
Web Title: Gautam Gambhir will definitely discuss with KKR team owner Shah Rukh Khan if he wants to become the coach of Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.