मुंबई : भारतीय संघाला लाभलेला सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक गौतम गंभीरने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अखेर रामराम केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बरीच वर्ष दूरावलेल्या गौतम गंभीरच्या या निर्णयाचे सर्वांकडून स्वागत होत आहे. मैदानावरील फटकेबाजीप्रमाणे त्याने निवृत्तीचेही अचूक टायमिंग साधले. 2007 आणि 2011 च्या विश्वचषक विजयात सिंहाचा वाटा असलेल्या गंभीरने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान नेहमी स्मरणार्थ राहील. इंडियन प्रीमिअर लीगमधील दिल्ली डेअरडेव्हिल्स संघानेही दुर्लक्षित केल्यामुळे गंभीरने निवृत्तीचा निर्णय घेतला. रणजी स्पर्धेत दिल्लीकडून अखेरचा सामना खेळून तो क्रिकेटला बाय बाय करणार आहे. गंभीरच्या 'Fantastic Five' इनिंग्सवर टाकलेली नजर...
श्रीलंकेविरुद्धच्या पाच वन डे मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकून आघाडी घेतली होती. तिसऱ्या वन डेत विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा गंभीरने निर्धार केला. वीरेंद्र सेहवाग अवघ्या तीन धावांवर माघारी परतल्यानंतर गंभीरने महेंद्रसिंग धोनीसह 188 धावांची भागीदारी केली. गंभीरच्या 150 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 5/332 धावांचा डोंगर उभा केला.
2) 75 वि. पाकिस्तान, 2007 ICC World T20: पहिल्यावहिल्या ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर आले होते. युसूफ पठाण, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांची कामगिरी निराशाजनक झाली, परंतु गंभीरने 75 धावांची उपयुक्त खेळी करून संघाला 5/157 अशी समाधानकारक मजल मारून दिली.
3) 150 वि. श्रीलंका, ईडन गार्डन 2009 :
कोलकाता नाईट रायडर्स संघाशी जोडलेला असल्याने कोलकाता हे गंभीरचे घरच होते. मात्र त्याआधीच गंभीरने कोलकाता वासीयांना आपलेसे केले होते. इडन गार्डनवर गंभीरने 150 धावांची वैयक्तिक खेळी साकारताना विराट कोहलीसह 224 धावांची भागीदारी केली होती. या खेळीच्या जोरावर भारताने 316 धावांचे लक्ष्य 9 चेंडू राखून पार केले होते.
4) 206 वि. ऑस्ट्रेलिया, फिरोजशाह कोटला 2008:वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांची विकेट झटपट पडल्यानंतर गंभीरने कौशल्यपूर्ण खेळ करताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करताना संघाच्या डावाला आकार दिला. त्या सामन्यात त्याने 206 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मालिकेत गंभीरने सर्वाधिक 463 धावा केल्या होत्या आणि त्यात दोन शतक व एक अर्धशतकाचा समावेश होता.