गावस्कर साहेब, तुम्ही म्हणजे फलंदाजीचा शब्दकोश. एकेकाळी खेळाडू फक्त तुमची फलंदाजी पाहून घडले, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपला अमीट असा ठसाही उमटवला. तुम्ही जेव्हा रुईया महाविद्यालयाच्या समोरच्या दडकर मैदानात नेट्समध्ये यायचा, तेव्हा मुलं शाळा-कॅालेज सोडून तुमचा सराव पाहायला यायची. कौंटी क्रिकेट खेळत असतानादेखील तुम्ही कांगा लीगसाठी थेट मुंबई गाठायचा. तुमच्या या समर्पणाबद्दल काैतुक करावे तेवढे थोडेच. एक खेळाडू म्हणून तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडलीत. खेळाडू म्हणून तुम्ही महानच, अनेकांच्या गळ्यातील ताईत. खेळाडूंनी निवृत्त झाल्यावर काय करायला हवं, याचा उत्तम वस्तुपाठही दाखवून दिलात. तुम्ही समालोचक झालात. प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप ही स्पोर्ट्स मार्केटींग कंपनीही सुरु केली. बऱ्याच क्रिकेटपटूंना तुम्ही लिहीतंही केलंत. पण गावस्कर साहेब, जे तुम्ही आज केलं ते करायला नको होतं, अशीच इच्छा तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या दर्दी क्रिकेट रसिकांची आहे.
तुम्ही शिखर धवनची बाजू घेतलीत आणि मुंबईकर रोहित शर्मावर टीका केलीत. हे सामान्य लोकांना काहीसं गंभीर वाटणार नाही. तुमच्याकडे अनुभव दांडगा आहेच. पण फक्त एवढीच त्यामागे गोष्ट आहे, असं काही सूज्ञ चाहत्यांना वाटत नाही. तुमची कंपनी ही खेळाडूंचे व्यवस्थापन करते. या कंपनीशी धवन करारबद्ध आहे आणि त्यामुळेच तुम्ही त्याची बाजू घेता, अशी खसखस पिकायला सुरुवात झाली आहे. पण जर याकडे पाहिलं तर या टीकाकारांचे काही चुकते असं देखील वाटत नाही. एखाद्या खेळाडूला आपल्या कंपनीशी करारबद्ध करणं, यात काहीचं गैर नाही. पण त्या करारबद्ध खेळाडूची बाजू एक माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि स्तंभलेखक म्हणून सर्वांपुढे मांडणं, हे कितपत बरोबर आहे. यामध्ये परस्पर हितसंबंध जपले जात नाहीत का? हा यक्षप्रश्न आहे. त्याचे उत्तर तुम्ही द्यायला हवे, दर्दी क्रिकेट रसिकांना वाटत आहे.आपला तो धवन आणि दुसऱ्याचा तो रोहित, हे तुम्ही पहिल्यांदा केलेलं आहे, असंही नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुस-या कसोटीसाठी निवडण्यात आलेल्या संघाबाबत तुम्ही टीका केली होती. विराटने सलामीवीर शिखर धवन याला ‘बळीचा बकरा’ बनविले असून त्याच्या निवडीवर नेहमीच ‘टांगती तलवार’ असल्याचे तुम्ही म्हटले होते. हे सारे इथपर्यंत ठिकही होते. पण त्यानंतर तुम्ही, रोहित शर्मालाच अन्य खेळाडूंच्या तुलनेत झुकते माप का दिले जाते? कर्णधार कोहलीची यामागील समीकरणे काय आहेत? असंही म्हटले होते. यावेळी तुम्हाला रोहितवर घसरण्याची खरेच गरज होती का? आतापर्यंत धवन कितीवेळा सातत्यपूर्ण खेळला आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. कधी कधी खेळाडूकडून अपेक्षित कामगिरी होत नाही, हे तुम्हाला सांगणेच न बरे. कारण अशी परिस्थिती तुमच्यापेक्षा जास्त कोण समजू शकेल.
धवन तुमच्या कंपनीशी करारबद्ध आहे, त्याच्याबद्दल जाहीररीत्या बोलत आहात, हे चुकीचं आणि आपल्या खेळाडूला सावरण्यासाठी आपल्याच शहरातील खेळाडूवर टीकेच धनी करणं, हे तर साफ चुकीचंच. याविषयी चर्चा सुरु असताना काही जणं, खासगित बोलली तेही खरं असू शकतं. त्यांचं म्हणणं असं होतं की, रोहितच्या पत्नीचीही स्पोर्ट्स व्यवस्थापन कंपनी आहे. तिच्या कंपनीमध्ये भारताच्या संघातील मोठे खेळाडू आहेत. तुमचे आणि त्यांच्या कंपनीमध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे हे असं, होत असेल का? असं काही जणांना वाटतं खरं. पण आम्हाला नाही. कारण तुमच्याकडे स्पोर्ट्समन स्पीरीट आहे, ते साऱ्यांनी पाहिलंदेखील आहे. त्यामुळे असं होईल, असं आम्हाला तरी माहिती नाही. पण तुम्ही नेहमीच सरळ बॅटने खेळत आले आहात. या प्रश्नांवरही तुम्ही खरंखरं उत्तर द्याल, अशी चाहत्यांनी अपेक्षा आहे. तुम्ही त्यावर खरे उतराल, हा विश्वास आम्हाला आहे. तसदीबद्दल क्षमस्व, लोभ असावा.