ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याचा भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्यासोबत वाकयुद्धामध्ये सहभागी होण्याचा कुठलाही विचार नाही. माझ्या नेतृत्वाबाबत भारताच्या या महान फलंदाजाने केलेल्या आकलनाची मला चिंता नसल्याचे पेनने म्हटले आहे. सिडनी कसोटीदरम्यान पेनने रविचंद्रन अश्विनविरुद्ध स्लेजिंग केले होते. त्यानंतर गावसकर यांनी राष्ट्रीय संघाच्या कर्णधाराला हे शोभत नसून कर्णधार म्हणून त्याचे मोजकेच दिवस शिल्लक आहे, असे म्हटले होते.
गावसकर यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता पेन म्हणाला, ‘मी ऐकले आहे, पण त्या वादात मी पडण्यास इच्छुक नाही. गावसकर यांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, पण त्याला माझ्यावर परिणाम होणार नाही.’ पेनने आपल्या वर्तनासाठी सार्वजनिक रूपाने माफी मागितली होती. भविष्यात यानंतर चेहऱ्यावर हास्य ठेवत खेळणार असल्याचे त्याने म्हटले होते. पेन म्हणाला, ‘मी माझ्या कारकिर्दीत ९९ टक्के समाधानाने खेळलो आहे. त्यामुळे मला सर्वोत्तम कामगिरी करता आली. त्या दिवशी मी अतिउत्साहात होतो. मी प्रेक्षकांकडे बघितले आणि मला कल्पना आली की मी कसोटी सामन्यात संघाच नेतृत्व करीत आहे. मी नेहमी तसे स्वप्न बघितले होते. मी स्पर्धात्मक क्रिकेट खेळणार असून, विजयाच्या निर्धाराने खेळेल.’