लंडन, दि. 10 - इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन हा ५०० विकेट्स घेणारा जगातील सहावा तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. अँडरसन त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 500 बळी पूर्ण केले आहेत. लॉर्ड्सवर वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा सलामीवीर क्रेग ब्राथवेटला बाद करत जेम्स अँडरसनने कारकिर्दितील 500 कसोटी बळी पूर्ण केले. 129 कसोटी सामन्यामध्ये अँडरसनने 500 बळी घेतले आहेत.
इंग्लंडसाठी 500 विकेट्स घेणारा अँडरसन हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन 800 कसोटी बळी, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न 708 कसोटी बळी, भारताचा अनिल कुंबळे 619 कसोटी बळी, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्रा5630 कसोटी बळी तर वेस्ट इंडीजचा कोर्टनी वॉल्श 519 कसोटी बळी घेतले आहेत.
तेजतर्रार गोलंदाज जेम्स अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर इंग्लंडने काल लॉर्डस्वर वेस्ट इंडिजविरुद्ध तिस-या कसोटी सामन्यात ९ गडी राखून विजय नोंदवताना ३ सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. अँडरसनने २०.१ षटकांत ४२ धावांत ७ गडी बाद केले. त्याच्या या शानदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दुसरा डाव तिस-या दिवशी १७७ धावांत गुंडाळला. ३५ वर्षीय अँडरसनने याआधी २००८ मध्ये ट्रेंटब्रिजवर न्यूझीलंडविरुद्ध १२९ कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम ४३ धावांत ७ बळी ही कामगिरी मागे टाकली. अँडरसनने लॉर्डस्वर कसोटी डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची पाचव्यांदा किमया साधली. इंग्लंडचा महान अष्टपैलू इयान बॉथमने अशी कामगिरी लॉर्डस्वर सर्वात जास्त आठ वेळेस केली आहे.
हेडिंग्लेत २ शतके ठोकून वेस्ट इंडिजला विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यात निर्णायक भूमिका बजावणा-या शाइ होपने सर्वाधिक ६२ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज कायरन पॉवेलने ४५ धावा केल्या. या दोघांशिवाय एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. अँडरसनच्या कामगिरीमुळे इंग्लंडला विजयासाठी फक्त १०७ धावांचे लक्ष्य मिळाले आणि त्यांनी हे लक्ष्य २८ षटकांत १ गडी गमावून १०७ धावा करीत पूर्ण केले. मार्क स्टोनमन (नाबाद ४० धावा) आणि टॉम वेस्टले (नाबाद ४४) यांनी दुस-या गड्यासाठी नाबाद ७२ धावांची भागीदारी करताना इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.