भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या तब्येतीत सुधारणा होताच सोमवारी त्याला मॅक्स रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षातून बाहेर काढण्यात आले. ऋषभवर आता खासगी वॉर्डात उपचार केले जातील.
पंतला अतिदक्षता कक्षातून बाहेर काढण्यात येऊन खासगी वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. ऋषभला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया ऋषभ पंतची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय चमूतील डॉक्टरांनी दिली. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाने पंतला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बीसीसीआयने आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला.
ऋषभ आशा आहे तू बरा आहेस. गेल्या वर्षभरात मला तुमच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. यादरम्यान तु कठीण परिस्थितीत भारतीय कसोटी इतिहासात अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. अशा परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे हे तुला माहीत आहे. लवकर भेटू, असं भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कर्णधार आहे. तो म्हणाला की, ऋषभ तु लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. मला माहित आहे की तू एक लढवय्य आहेस. गोष्टी नेहमी सारख्या नसतात. हेच आयुष्य आहे. तू प्रत्येक दरवाजा तोडून पुनरागमन करशील. तुझ्यासोबत संपूर्ण टीम आणि संपूर्ण देश आहे, असं हार्दिक पांड्याा व्हिडिओमध्ये म्हणाला.
दरम्यान, आईला 'सरप्राईज' देण्यासाठी ऋषभ मर्सिडिज कारने रुरकी येथील स्वतःच्या घरी जात असताना शुक्रवारी पहाटे दिल्ली- डेहराडून राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. कार दुभाजकावर आदळून किमान चारवेळा उलटल्याने आग लागली होती. सुदैवाने पंत त्यातून बचावला. मात्र, त्याच्या डोक्याला, मनगटाला, गुडघ्याला आणि घोट्याला पाच ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. त्यावर ताबडतोब शस्त्रक्रिया करण्यात आली. स्थानिक उपचारानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात हलविण्यात आले होते.
पंतला विश्रांतीची गरज-
अपघातात झालेल्या दुखापतींमुळे पंतला अजूनही वेदना होत असून त्याच्या भेटीसाठी गर्दी न करता त्याला ''विश्रांतीसाठी वेळ द्यावा, असेही ते म्हणाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, डीडीसीएचे संचालक शाम शर्मा, बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर क्रिकेटपटू नितीश राणा, खानपूरचे आमदार उमेश कुमार याचबरोबर स्थानिक राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनीही रुग्णालयाला भेट देत पंतच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यानंतर पंतच्या आईचीदेखील भेट घेतली.