लखनौ : वन डे विश्वचषकात आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. भारताने दिलेल्या २३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला दोन मोठे झटके बसले आहेत. जसप्रीत बुमराहने डेव्हिड मलान आणि जो रूट यांना तंबूत पाठवले. मलानचा त्रिफळा काढत बुमराहने इंग्लिश संघाला पहिला झटका बसला, तर रूट शून्यावर एलबीडब्ल्यू बाद झाला.
दरम्यान, जॉनी बेयरस्टो आणि डेव्हिड मलान यांनी सावध खेळी करून सुरूवातीपासूनच यजमानांची डोकेदुखी वाढवायला सुरूवात केली. मोहम्मद सिराजला मार पडल्यानंतर जसप्रीत बुमराहने आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवताना २ महत्त्वाचे बळी घेतले. मलान (१६) धावांवर असताना चेंडूने बॅटला स्पर्श करत स्टम्पाकडे धाव घेतली अन् त्रिफळा उडाला. फॉर्मच्या शोधात असलेल्या रूटला आजही मोठी खेळी करता आली नाही अन् तो पहिल्याच चेंडूवर चीतपट झाला.
इंग्लंडसमोर ३३० धावांचे आव्हानरोहित शर्मा वगळता भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना साजेशी खेळी करण्यात आज अपयश आले. शुबमन गिल (९), विराट कोहली (०) आणि श्रेयस अय्यर (४) माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ४० अशी झाली होती. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी दमदार भागीदारी करताना इंग्लंडच्या पार्ट टाईम गोलंदाजांना चोपले. १११ चेंडूंत ९१ धावांची भागीदारी ३१व्या षटकात डेव्हिड विलीने संपुष्टात आणली. लोकेश ५८ चेंडूंत ३८ धावांवर झेलबाद झाला. रोहितसह सूर्यकुमार यादवने ३३ धावांची भागीदारी केली होती आणि ही जोडी तोडण्यासाठी इंग्लंडने अनुभवी गोलंदाज आदील राशीदला बोलावले. त्याच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. लिएम लिव्हिंगस्टोनने सुरेख झेल घेतला, परंतु त्याचा गुडघा मैदानावर जोरात आदळला. त्याला दुखापत झाली. रोहितने १०१ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८७ धावा केल्या. रवींद्र जडेजा ८ धावांवर माघारी परतल्याने भारताची अडचण वाढली, राशीदने त्याला पायचीत पकडले. मार्क वूडने पुढील षटकात मोहम्मद शमीला ( १) बाद करून भारताला सातवा धक्का दिला. सूर्यकुमारवर आता तळाच्या गोलंदाजांनासोबत घेऊन भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून देण्याची जबाबदारी होती. तो ४७ चेंडूंत ४९ धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराहने ( १६) चांगला खेळ करताना संघाला ९ बाद २२९ धावांपर्यंत पोहोचवले.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.