East Asia Cup Highest: आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या भागीदारीचा विश्वविक्रम नुकताच मोडला गेला. अफगाणिस्तानच्या उस्मान घनी आणि हजरतुल्ला झाझाई यांनी २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध २३६ धावांची भागीदारी केली होती. तो महाकाय विक्रम आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्येच मोडला गेला. पहिल्यांदाच एका जोडीने २५०हून अधिक धावांची भागीदारी केली. जपानच्या लाचलान यामामोटो लेक आणि केंडल काडोवाकी-फ्लेमिंग यांनी पहिल्या विकेटसाठी नाबाद २५८ धावांची भागीदारी केली. यापूर्वी कोणत्याही T20 क्रिकेटमध्ये २५०पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली नव्हती.
दोन्ही ओपनर्सची शतके
जपानचा हा सामना चीन विरुद्ध होता. या सामन्यात २० षटके खेळूनही जपानचा एकही खेळाडू बाद झाला नाही. या सामन्यात जपानचे सलामीवीर लचलान यामामोटो लेक आणि केंडल काडोवाकी-फ्लेमिंग या दोघांनी शतकी खेळी केली. लचलानने ६८ चेंडूत १३४ धावा केल्या. त्याच्या खेळीत १२ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. तर केंडल काडोवाकीने ५३ चेंडूत १०९ धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने ३ चौकार आणि ११ षटकार मारले. T20 सामन्याच्या एकाच डावात दोन शतके झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०२२ मध्ये चेक प्रजासत्ताकने बल्गेरियाविरुद्ध ही कामगिरी केली होती.
दुसऱ्यांदाच घडला असा प्रकार
२० षटके खेळूनही जपानने एकही गडी गमावला नाही. पूर्ण १२० चेंडू खेळल्यानंतर कोणत्याही संघाची विकेट पडण्याची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २०२२ मध्ये विलेटा कपमध्ये असे घडले होते. जिब्राल्टर संघाने बल्गेरियाविरुद्ध एकही विकेट न गमावता २१३ धावा केल्या होत्या. त्या डावात एकही शतक झाले नाही, पण बल्गेरियाच्या गोलंदाजांनी २८ अतिरिक्त धावा दिल्या.
चीनचा १८० धावांनी पराभव
२५८ धावांच्या प्रत्युत्तरात चीनचा डाव अवघ्या ७८ धावांवर आटोपला. जपान १८० धावांनी जिंकला. आंतरराष्ट्रीय T20मधील धावांच्या बाबतीत हा ७वा सर्वात मोठा विजय आहे. सलामीवीर वोई गु लीने संघाकडून २४ धावांची खेळी खेळली. याशिवाय फक्त झो कुई (१०) दुहेरी आकडा गाठू शकला. जपानकडून काझुमा काटो स्टॅफोर्ड आणि माकोटो तानियामा यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.