मेलबर्न : क्रिकेटविश्वातील दिग्गजांनी रविवारी आयोजित विशेष मदतनिधी सामन्याच्या माध्यमातून आॅस्ट्रेलियातील जंगलांमध्ये लागलेल्या आगीतील पीडितांसाठी निधी गोळा करण्यास मदत केली. या लढतीत लाराने शानदार फटकेबाजी करताना ३० धावांची नाबाद खेळी केली.
वेस्ट इंडिजच्या या महान फलंदाजाने मेलबर्न जंक्शन ओव्हलवर कव्हर ड्राईव्ह व स्ट्रेट ड्राइव्हच्या शानदार फटक्यांनी उपस्थित क्रिकेटप्रेमींना खूश केले. या शानदार खेळीदरम्यान त्याने दोन खणखणीत षटकारही ठोकले. त्यानंतर स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या या लढतीत अन्य फलंदाजांना संधी दिली. त्याचा कर्णधार रिकी पाँटिंग जस्टिन लँगर बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर दाखल झाला. त्याने २६ धावा केल्या. त्याच्या संघाने १० षटकांत ५ बाद १०४ धावांची मजल मारली.
अॅडम गिलख्रिस्टने लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. तो बाद झाल्यानंतर शेन वॉटसनने ९ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. वॉटसनने पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रमविरुद्ध बऱ्याच धावा फटकावल्या. मात्र, गिलख्रिस्ट इलेव्हनच्या शानदार प्रयत्नानंतरही रिकी पाँटिंग इलेव्हनने एका धावेने विजय मिळवला.
पाँटिंग म्हणाला, ‘सर्व खेळाडू खेळले आणि सर्वांना आणखी खेळण्याची इच्छा होती. सर्वांचा सहभाग शानदार ठरला. ज्या खेळाडूंसोबत २५ वर्षे ड्रेसिंग रुम शेअर केली त्यांच्यासह पुन्हा खेळण्याचा अनुभव शानदार होता.’ (वृत्तसंस्था)
सामन्यानंतर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने टिष्ट्वट केले,‘आॅस्ट्रेलिया व जगातील सर्व क्रिकेटपटूंचे आभार. आम्ही अलीकडे जंगलातील आगीतील पीडितांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी ७७ लाख आॅस्ट्रेलियन डॉलरची रक्कम गोळा केली.’ सप्टेंबरमध्ये लागलेल्या आगीनंतर मदत निधी गोळा करण्याचा प्रयत्न सर्व स्तरातून सातत्याने सुरू आहे.