मुंबई : बीसीसीआयने शनिवारी इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर केला. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी १५ खेळाडूंच्या नावांची घोषणा केली तेव्हा कर्णधार रोहित शर्मा उपस्थित होता. यशस्वी जैस्वाल हा पहिल्यांदा एकदिवसीय सामन्यांसाठी संघात दाखल झाला तर शुभमनलादेखील प्रथमच उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. हर्षित राणा हा केवळ इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठी संघात असेल.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा वर्षभरानंतर संघात दाखल झाला. नोव्हेंबर २०२३ पासून तो बाहेर होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जखमी झालेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालादेखील स्थान देण्यात आले मात्र फिटनेसवर त्याचे खेळणे अवलंबून असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम संघ आयसीसीकडे ११ फेब्रुवारीपर्यंत पाठवायचा आहे. संघात चार अष्टपैलू खेळाडूंना स्थान देण्यात आले. यावर रोहित म्हणाला, ‘असे पर्याय आमच्या हितावह आहेत.’ बीसीसीआयच्या नव्या निर्बंधांबाबत प्रश्न करताच रोहित म्हणाला, ‘मी बरेच क्रिकेट खेळलो आहे. लाल आणि पांढऱ्या चेंडूवर सारखाच खेळलो. मी रणजी सामनेदेखील खेळणार आहे.’
१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानच्या यजमानपदाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार आहे. लाहोर, कराची, रावळपिंडी आणि दुबई येथे सामने होतील. भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळेल. पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबईत होईल.
११ जणांना संधी२०२३ चा वनडे विश्वचषक खेळणाऱ्या ११ खेळाडूंना यंदा पुन्हा संधी देण्यात आली. त्यात रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. चार खेळाडूंना डच्चू मिळाला, त्यात सूर्यकुमार यादव, ईशान किशन, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश असून त्यांच्या जागी ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग हे चार नवे चेहरे संघात दाखल झाले आहेत.
संजू सॅमसनकडे पुन्हा दुर्लक्ष संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आले संजूने मागच्या पाच सामन्यात तीन शतके झळकावली आहेत. ज्याने जवळपास ५७च्या सरासरीने दमदार कामगिरी केली. चॅम्पियन्स ट्रॉफी संघात चर्चेत असलेल्या खेळाडूंच्या संभाव्य यादीत संजू सॅमसनच्या नावाचाही समावेश होता, मात्र दुर्दैवाने त्याला संघात स्थान मिळाले नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्ये न खेळल्यामुळे त्याला शिक्षा झाल्याचा दावाकेला जात आहे. ऋषभ पंत संघाचा मुख्य यष्टिरक्षक आणि लोकेश राहुलला बॅकअप खेळाडू म्हणून संधी मिळाल्याने संजूवर अन्याय झाल्याची माहिती पुढे आली. संजूने १६ एकदिवसीय सामन्यांच्या १४ डावांत ५६.६६ च्या सरासरीने आणि ९९.६० च्या स्ट्राईक रेटने ५१० धावा केल्या आहेत.
रोहितचा वारस ठरला?बीसीसीआय गिलचा भविष्यातील कर्णधार म्हणून गांभीर्याने विचार करीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. रोहितनंतर वनडे संघाचे कर्णधारपद गिलकडे सोपवले जाण्याचीही शक्यता दाट आहे. गिलने यापूर्वी जुलै २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व करीत ४-१ ने मालिका जिंकली होती.गिलने ४७ वनडे सामने खेळले असून ६ शतकांसह २,३२८ धावा केल्या आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघफलंदाज : रोहित शर्मा कर्णधार, शुभमन गिल उपकर्णधार, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर.यष्टिरक्षक : लोकेश राहुल आणि ऋषभ पंत.अष्टपैलू : हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर.फिरकी गोलंदाज : कुलदीप यादववेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.