भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने भारतीय संघातील एका खेळाडूपासून ऑस्ट्रेलियन संघाला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. रिकी पाँटिंगने शुभमन गिल, रोहित शर्मा किंवा विराट कोहलीचं नाव घेतलेलं नाही. तर त्याने चेतेश्वर पुजाराचा उल्लेख केला आहे.
रिकी पाँटिंगने सांगितले की, ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहलीबाबत विचार करत असेल. त्याबाबत काही शंका नाही. मात्र त्याशिवायही एक खेळाडू आहे जो त्यांच्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून चेतेश्वर पुजारा आहे. चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाला आधीही अनेक सामन्यांमध्ये त्रस्त केलेले आहे. ऑस्ट्रेलियन संघामध्ये पुजाराबाबत चर्चा होण्याचं कारण त्याची कामगिरी आहे. त्याने आधीही ऑस्ट्रेलियाला हैराण केलेलं आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियातसुद्धा जबरदस्त फलंदाजी केली आहे.
चेतेश्वर पुजारा डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कौंटी क्रिकेटमध्ये खेळताना पुजाराने ६ सामन्यांमधील ८ डावांमध्ये ३ शतकं फटकावली आहेत. त्याचा हा फॉर्म पाहून ऑस्ट्रेलियन संघामध्ये निश्चितपणे चिंतेचं वातावरण आहे. पुजाराने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये १९ शतके ठोकली आहेत. त्यात त्याच्या तीन द्विशतकांच्या समावेश आहे. तसेच यादरम्यान २०६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.