मुंबई : फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर ग्रीन बॉम्बे हायस्कूल संघाने गाइल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या तिस-या फेरीत उद्यांचल हायस्कूलचा १२३ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना ग्रीन बॉम्बेने ८ बाद २१२ धावांची मजल मारल्यानंतर उद्यांचलचा डाव केवळ ८९ धावांत संपुष्टात आला.
आझाद मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ग्रीन बॉम्बे संघाने आक्रमक फलंदाजी करताना आव्हानात्मक धावसंख्या गाठली. अमन अन्सारीने शानदार ९१ धावांची खेळी करत उद्यांचलच्या गोलंदाजांची पिटाई केली. त्याचे शतक केवळ ९ धावांनी हुकले. त्याचवेळी तनिष्क गवते (४५) आणि जावेद अली (३१) यांनीही मोक्याच्यावेळी फटकेबाजी करताना अमनला चांगली साथ दिली.
आव्हानाचा पाठलाग करताना उद्यांचलचा डाव केवळ ८९ धावांमध्ये गडगडला. अरबाझ याने टिच्चून मारा करताना केवळ १४ धावांच्या मोबदल्यात ४ खंदे फलंदाज बाद करत उद्यांचलच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याच्या भेदकतेपुढे उद्यांचल संघाचा एकही फलंदाज आपली छाप पाडू शकला नाही.
दुसरीकडे सुरु असलेल्या हॅरीश शिल्ड स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी बलाढ्य अल बरकत संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २७१ धावांची मजल मारली.
कांदिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने बॉम्बे जिमखान्यावर सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नील पाताडे (२/४६), निशांत कदम (२/५६) यांनी नियंत्रित मारा करत अल बरकतच्या धावगतीला वेसण घातले. अंकित यादव (७२), सौमिल मालंदकर (९२) आणि अथर्व निग्रे (३२) यांनी केलेल्या शानदार फलंदाजीमुळे अल बरकत संघाला पहिल्या दिवशी समाधानकारक मजल मारला आली.
- ग्रीन बॉबे संघाच्या एकतर्फी विजयामध्ये निर्णायक खेळी करुन संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणारे (डावीकडून) जावेद अली, अमन अन्सारी आणि तनिष्क गवते. या तिघांनी उद्यांचल संघाच्या सुमार गोलंदाजीचा खरपूस समाचार घेताना ग्रीन बॉम्बे संघाला दोनशेच्या पलीकडे मजल मारुन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यानंतर गोलंदाजीतही ग्रीन बॉम्बे संघाने अचूक मारा करताना उद्यांचल संघाला सुरुवातीपासून दबावाखाली ठेवण्यात यश मिळवले.
Web Title: Gilles Shield Cricket: Green Bombay team's winning march, Udaychanchal High School smashes 123 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.