चटगाव : सलामीवीर शुभमन गिलचे पहिले आणि अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या वेगवान शतकी खेळीच्या बळावर भारताने बांगलदेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आपला दुसरा डाव २५८ धावांवर घोषित करीत, यजमानांपुढे विजयासाठी ५१३ धावांचे आव्हान ठेवले.
भारताने तिसऱ्या दिवशी शुक्रवारी पहिल्या सत्रात बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत संपुष्टात आणला. कुलदीप यादवने ४० धावात पाच, तर मोहम्मद सिराजने तीन गडी बाद केले. त्यानंतर, पहिल्या डावात २५४ धावांची आघाडी घेतल्यानंतर, भारताने शुभमन गिल (११०) आणि चेतेश्वर पुजारा (१०२) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात २ बाद २५८ धावा अशी मजल मारत डाव घोषित केला. बांगलादेशने तिसऱ्या दिवसअखेर १२ षटकांत बिनबाद ४२ धावा केल्या आहेत. खेळ संपला, त्यावेळी शंटो २५ तर झाकिर हसन १७ धावांवर नाबाद होते.
बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळल्यानंतर फॉलोऑन न देता, फलंदाजी करण्याचा भारताने निर्णय घेतला. सलामी जोडी लोकेश राहुल आणि शुभमन गिल यांनी ७० धावांची दमदार भागीदारी केली. राहुल २३ धावा करून बाद झाल्यानंतर, शुभमनने खेळाची सूत्रे हातात घेत, पुजारासोबत दुसऱ्या गड्यासाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. गिलने संधी मिळताच, मोठे फटके मारत चहापानापर्यंत ८० धावांपर्यंत मजल मारली, नंतर त्याने चौकार ठोकून शतक गाठले.
गिलच्या शतकाला डीआरएसची साथचटगाव : सलामीवीर शुभमन गिलने पहिले कसोटी शतक ठोकले. त्याने आक्रमक फलंदाजी करत १५२ चेंडूत ११० धावांची खेळी केली. या शतकी खेळीला नशिबाचीदेखील मोठी साथ लाभली. ऐनवेळी डीआरएस बंद पडल्यामुळे गिलला झुकते माप मिळाले. ३२ व्या षटकात डीआरएसने बांगलादेशचा घात केला. यासीर अलीने पहिला चेंडू टाकला. हा चेंडू गिलच्या पॅडवर आदळला. बांगलादेशच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली. मैदानावरील पंचांनी ही अपील फेटाळून लावत गिलला नाबाद ठरवले. कर्णधार शाकिब अल हसनने कधी नव्हे तो डीआरएस घेतला. यानंतर मैदानावर बराच काळ गोंधळाचे वातावरण होते. अखेर पंचांनी शाकिबला डीआरएस घेता येणार नाही, असे सांगितले. कारण डीआरएसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. शाकिब यामुळे खूप चिडला होता. यजमानांना आधी बेल्सने व नंतर डीआरएसने दगा दिला.
गिल-पुजारा यांनी दुसऱ्या गड्यासाठी ११३ धावांची भागीदारी केली. गिल १५२ चेंडूंत ११० धावा काढून माघारी परतला. पुजाराने आपला गीअर बदलला आणि चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. पुजाराने अर्धशतकानंतर आक्रमक फलंदाजी करीत १३० चेंडूंत शतक पूर्ण केले. पुजाराचे हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान शतक ठरले. यानंतर, भारताने आपला दुसरा डाव २ बाद २५८ धावांवर घोषित केला.
कुलदीपने रचले विक्रमांचे मनोरे कुलदीप यादवने २२ महिन्यांनंतर पुनरागमन करीत बांगलादेशविरुद्ध पहिल्या डावात ४० धावांची सर्वोत्कृष्ट खेळी केली. यानंतर ४० धावात पाच फलंदाजांना बाद केले. यापूर्वी अश्विन आणि कुंबळे यांनी या संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. अश्विनने २०१५ मध्ये या संघाविरुद्ध ८७ धावांत ५ बळी घेतले, तर कुंबळेने ४/५५ अशी आकडेवारी नोंदवली होती. कुलदीपने कारकिर्दीत तिसऱ्यांदा पाच बळी घेतले. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज संघाविरुद्ध त्याने हा पराक्रम केला आहे. बांगलादेशविरुद्ध कसोटीच्या एका डावात पाच बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव सातवा खेळाडू ठरला. इरफान पठाणने तीन वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतले असून झहीर खाने हा कारनामा दोन वेळा केला. आश्विन, सुनील जोशी, ईशांत शर्मा, उमेश यादव आणि कुलदीप यादवने ही किमया एकदा साधली. चटगाव मैदानावर पाच बळी घेणारा कुलदीप हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने १६ षटके गोलंदाजी करताना ४० धावा दिल्या आणि पाच बळी घेतले. त्याने मुशफिकूर रहीम, शाकिब अल हसन, नुरुल हसन, तैजुल इस्लाम आणि इबादत हुसेन या तंबूत पाठवले.
धावफलक भारत पहिला डाव : १३३.५ षटकात सर्वबाद ४०४. बांगलादेश पहिला डाव : ५६.५ षटकात सर्वबाद १५० गोलंदाजी : सिराज ३/२०, उमेश यादव १/३३, कुलदीप यादव ५/४०. भारत दुसरा डाव : लोकेश राहुल झे. तैजुल इस्लाम गो.खालिद अहमद २३, शुभमन गिल झे. बदली खेळाडू गो. मेहदी हसन मिराज ११०, चेतेश्वर पुजारा नाबाद १०२, विराट कोहली नाबाद १९, एकूण : ६१.४ षटकात २ बाद २५८. बाद क्रम : १-७०, २-१८३ गोलंदाजी : खालिद अहमद १/५१, मेहदी हसन १/८२. बांगला देश दुसरा डाव : नजमुल हुसैन शंटो नाबाद २५, झाकिर हसन नाबाद १७, एकूण : १२ षटकात बिनबाद ४२ धावा.