नवी दिल्ली : ‘वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची संघव्यवस्थापनाने खूप काळजी घ्यायला हवी. गरज भासल्यास इंग्लंडविरुद्ध आगामी स्थानिक मालिकेत त्याला विश्रांती द्यायला हवी,’ असे मत माजी सलामीवीर गौतम गंभीर याने गुरुवारी व्यक्त केले. आयपीएलपासून सलग पाच महिने खेळत असलेला बुमराह जखमेमुळे ब्रिस्बेनची चौथी कसोटी खेळू शकणार नाही. त्याच्या पोटाचे स्नायू ताणले गेले आहेत. ‘पाच फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरू होत असलेल्या इंग्लंडविरुद्ध मालिकेतील सर्व सामने खेळण्याची बुमराहला सक्ती करू नका. तो दीर्घकाळ देशासाठी गोलंदाजीची धुरा सांभाळणारा गोलंदाज असल्याने विशेष काळजी घ्यायला हवी. त्याचे फिट असणे फार गरजेचे आहे,’ असे मत गंभीरने ‘स्टार स्पोर्टस् ’या वाहिनीशी बोलताना व्यक्त केले.
गंभीर पुढे म्हणाला,‘ भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांची मालिका खेळणार असून बुमराहला चाहरी सामन्यात खेळविणे हा त्याच्यावर अन्याय ठरेल. इशांत फिट नाही, मोहम्मद शमी आणि उमेश यादवदेखील जखमी असल्याची मला जाणीव आहे. भारतात बुमराह अधिक धोकादायक सिद्ध होईल, याची मला जाणीव आहे. त्याने भारतात अद्याप कसोटी सामना खेळलेला नाही. संघ व्यवस्थापन त्याची योग्य काळजी घेईल, असे वाटते.’ त्याचप्रमाणे, ‘बुमराह इंग्लंड, द. आफ्रका व ऑस्ट्रेलियात बरेच सामने खेळला. भारतीय संथ खेळपट्ट्यांवर ‘रिव्हर्स स्वींग’ करण्यात तो यशस्वी ठरेल,’ असा विश्वासही गंभीरने व्यक्त केला आहे.