Join us  

आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे द्या

भारत, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यासारख्या मोठ्या संघासोबत जुळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये कथित स्पॉट फिक्सिंग व पिच फिक्सिंगच्या स्टिंग आॅपरेशनचे असंपादित फुटेज आम्हाला उपलब्ध करून द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 3:45 AM

Open in App

दुबई : भारत, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यासारख्या मोठ्या संघासोबत जुळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये कथित स्पॉट फिक्सिंग व पिच फिक्सिंगच्या स्टिंग आॅपरेशनचे असंपादित फुटेज आम्हाला उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी आज पुन्हा एकदा फिक्सिंगचा दावा करणाऱ्या वाहिनीकडे केले आहे. आयसीसीने एडिट न झालेल्या फुटेजची मागणी केली असून महाव्यवस्थापक (एसीयू) अ‍ॅलेक्स मार्शल यांनी वृत्तवाहिनी सहकार्य करीत नसल्याचे म्हटले आहे. रिचर्डसन यांनी पुन्हा आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.रिचर्डसन म्हणाले, ‘मी अल जजीराला म्हटले की, त्यांनी त्यांच्याकडे असलेले क्रिकेटच्या भ्रष्टाचारासोबत जुळलेले सर्व पुरावे आम्हाला उपलब्ध करून द्यावे. आम्ही सखोल व निष्पक्ष चौकशी करू. भ्रष्टाचाराची चौकशी करताना सर्व आरोपांबाबत चौकशीदरम्यान कुठली कसर राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.’ ते पुढे म्हणाले की,‘त्यासाठी आम्हाला त्यांच्याकडे असलेली साक्ष तपासून बघणे आवश्यक आहे.’ अल जजीरा असंपादित फुटेज शेअर करण्यास इच्छुक नाही. कारण त्यामुळे त्यांच्या सूत्राचा खुलासा होईल, असा त्यांचा दावा आहे. रिचर्डसन यांनी आश्वासन दिले की, त्यांच्या सूत्राचा बचाव करण्यात येईल. रिचर्डसन म्हणाले,‘ सहकार्य करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे माझा उत्साह वाढला आहे आणि त्यांनी याबाबतचा सर्व दस्तावेज आमच्याकडे सोपवायला हवे. आम्ही पत्रकारिता सूत्राचा बचाव करण्याची गरज समजतो आणि त्याचा आदर करतो.आमच्या एसीयू समितीने अन्य मीडिया कंपनींसोबत याच आधारावर काम केलेले आहे.’रिचर्डसन पुढे म्हणाले,‘या आरोपांना सिद्ध करण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी आम्हाला कार्यक्रमात दाखविण्यात आलेल्या साक्ष बघण्याची गरज आहे.’ अल जजीराने एक वृत्तपट प्रसारित केला. त्यात दाऊद इब्राहिम गँगचा एक कथित सदस्य अनिल मुन्नवरला अंडरकव्हर रिपोर्टरसोबत खेळपट्टी व निकाल फिक्स करण्याबाबत चर्चा करताना दाखविण्यात आले आहे.पाकिस्तानचा माजी कसोटीपटू हसन राजा आणि मुंबईचा माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस यांनाही फिक्सिंगबाबत बातचित करताना दाखविण्यात आले आहे.भारतासोबत जुळलेले ज्या तीन कसोटी सामन्यांचा स्टिंग आॅपरेशनमध्ये उल्लेख आहे त्यात श्रीलंकेविरुद्ध गॉल, इंग्लंडविरुद्ध चेन्नई आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांचा समावेश आहे. आयसीसीच्या सध्याच्या चौकशीला बघताना वाहिनीने इंग्लंड व आॅस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंच्या नावांचा उल्लेख करताना ‘बीप’चा आवाज ऐकवला.क्रिकेट आॅस्ट्रेलिया व इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डांनी आपल्या खेळाडूंना पूर्ण पाठिंबा दिला असून भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत.(वृत्तसंस्था)