न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने तब्बल १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली. या पराभवामुळे भारतीय संघावर टीका होत आहे. अशातच संघाचे सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला. 'जर खेळपट्टी आमच्या मनाप्रमाणे बनवता आली असती, तर बरं झाले असते; पण असे होत नाही. क्युरेटर खेळपट्टी बनवतात. आम्हाला जशी खेळपट्टी मिळते, त्यावर आम्ही खेळतो,' असे अभिषेक नायर यांनी बुधवारी सांगितले. नायर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'क्रिकेटपटू आणि एक संघ म्हणून आम्हाला दिल्या जाणाऱ्या खेळपट्टीवर आम्ही खेळतो. आम्ही आमच्या इच्छेनुसार परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही.' कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे दोन प्रमुख फलंदाज सध्या अपयशी ठरत आहेत.
रोहित, कोहली यांच्याविषयी नायर यांनी सांगितले की, मी प्रत्येक ठिकाणी या दोन्ही खेळाडूंना मिळणारे प्रेम पाहिले आहे. याव्यतिरिक्त काहीच नाही पाहिले. जेव्हा कधी आघाडीचे खेळाडू कठीण परिस्थितीचा सामना करतात, तेव्हा त्यांना वेळ द्यावा लागतो आणि त्यांच्या पुनरागमनाचा विश्वास ठेवावा लागतो. ते कठोर मेहनत करत आहेत. प्रत्येक खेळाडूने अपार मेहनत घेतली आहे. प्रत्येकजण चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.'
भारतीय फलंदाजांच्या फिरकी माऱ्याविरुद्धच्या कामगिरीबाबत नायर म्हणाले की, 'हे काहीसे कठोर वक्तव्य ठरेल. सध्याचे भारतीय फलंदाज पूर्वीच्या फलंदाजांच्या तुलनेत फिरकी माऱ्याविरुद्ध अडखळतात. जेव्हा तुम्ही काही साध्य करण्याचा प्रयत्न करत असता, तेव्हा एक वेळ अशी येते, जेव्हा तुम्ही काही प्रमाणात मागे पडता. कारण, तुम्ही काहीसे वेगळ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करत असतात.'
एक वेळ अशीही येईल, जेव्हा चांगली कामगिरी होणार नाही. विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभव भारतीय क्रिकेटमधील सर्वांसाठी कठीण प्रसंग होता. मात्र, काही महिन्यांनी आपण विश्वविजेते होतो. पुनरागमनाचा प्रवास शानदार असतो. याप्रकारेच गोष्टी आणि इतिहास घडतात. - अभिषेक नायर