नवी दिल्ली: भारतीय संघाला आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी मधली फळी भक्कम करणाऱ्या फलंदाजाचा शोध आहे. यासाठी रवी शास्त्री आणि संदीप पाटील या भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी तिलक वर्माला विश्वचषक स्पर्धेसाठी खेळविण्याचा सल्ला भारतीय संघाला दिला आहे.
विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरदरम्यान भारतात खेळविण्यात येईल. शास्त्री म्हणाले, 'तिलक वर्मा डावखुरा फलंदाज असल्याने भारतीय संघाला त्याचा फायदा होईल. त्याच्या कामगिरीने मी खूप प्रभावित झालो आहे. मला मधल्या फळीत डावखुऱ्या फलंदाजाला खेळताना पाहण्याची इच्छा आहे. जर मधल्या फळीत युवराज सिंग, सुरेश रैना यांच्यासारखा फलंदाज पाहिजे असेल तर नक्कीच यासाठी मी तिलकच्या नावाच्या विचार करीन.' शास्त्री पुढे म्हणाले, 'संदीप पाटील आणि एमएसके प्रसाद यांनी राष्ट्रीय निवड समितीत काम केले आहे. जर मी निवड समितीमध्ये असतो, तर खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मकडे पाहून ते कशा प्रकारे कामगिरी करत आहेत, हे पाहिले असते.' तिलकने टी-२० मालिकेतून नुकतेच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.