मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटूंनी लक्ष्य केलं आहे. राजकोटमध्ये शनिवारी न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या टी-20 सामन्यात धोनीला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नव्हता. त्यावरून माजी खेळाडू व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि अजित आगरकरने धोनीला लक्ष्य करताना युवा खेळाडूंना संधी द्यावी असं म्हटलं आहे. या सामन्यात 9.1 षटकात 67/4 अशी भारताची अवस्था असताना धोनी मैदानावर आला. त्यावेळी भारतीय संघाला विजयासाठी 12 च्या सरासरीने धावा करण्याची गरज असताना धावांची गती वाढवण्यात धोनी अपयशी ठरला. केवळ 16 धावांसाठी त्याला 18 चेंडू खेळावे लागले.
धोनीने टी-20 क्रिकेटबाबत फेरविचार करावा -
याबाबत बोलताना लक्ष्मण म्हणाला, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनी ज्यावेळी मैदानात आला त्यावेळी कोहली त्याच्यासोबत खेळत होता. धोनीने विराट कोहलीला अधिक स्ट्राईक देणे गरजेचे होते. सध्या धोनी टी-२० क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसतोय. तो मैदानात उतरल्यानंतर सेट होण्यासाठी थोडा वेळ घेतो आणि त्यानंतर तो फटकेबाजी करण्यास सुरुवात करतो. कोहली 160 च्या सरासरीने धावा करत असताना धोनीची सरासरी केवळ 80 होती. त्या वेळेसाठी ती सरासरी योग्य नव्हती कारण टीम इंडिया मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत होती. त्यामुळे मला असं वाटतंय की, धोनीने टी-20 क्रिकेटबद्दल फेरविचार करण्याची गरज आहे. टी-20 मध्ये त्याने युवा खेळाडूंना संधी द्यावी. टी-20 सामन्यात धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे अपेक्षित आहे असं लक्ष्मणने सुचवलं. यावेळी बोलताना लक्ष्मणने धोनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचंही म्हटलं. त्यामुळे आता त्याने फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला लक्ष्मणने दिला.
धोनीला वगळलं तरी त्याची कमतरता भारतीय टीमला जाणवणार नाही-
इएसपीएन क्रिकइन्फोसोबत बोलताना अजित आगरकर म्हणाला, पर्याय शोधण्याची वेळ आता आली आहे, कमीतकमी टी-20 त तरी ती वेळ आली आहे असं मला वाटतं. एकदिवसीय सामन्यांचा विचार करता धोनीच्या प्रदर्शनावर शंका नाही असंही आगरकर म्हणाला. धोनीला मैदानावर जम बसवायला थोडा वेळ लागतो, पण टी-20 सामन्यात तुमच्याकडे जास्त वेळ नसतो. तुम्हाला कमी वेळात खूप चांगलं प्रदर्शन करायचं असतं. त्यामुळे टी-20 त धोनीला पर्याय शोधण्याची आता योग्य वेळ आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघातून धोनीला वगळलं तरी त्याची कमतरता भारतीय टीमला जाणवणार नाही कारण टी-20 साठी भारताकडे खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत. पर्याय शोधण्याची वेळ आता आली आहे.