रोहित नाईक
मुंबई : यंदाच्या आयपीएलसाठी फार उत्सुक आहे. कारण यंदा ५ वर्षांनी माझा फ्रेंचाईजी संघ बदलला आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा आयपीएल होईल, असे वाटले नव्हते. मात्र आता यूएईला जात असल्याचा खूप आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) फलंदाज सिध्देश लाड याने ‘लोकमत’कडे दिली.
मूळचा मुंबईकर असलेला सिध्देश २०१५ पासून गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघात होता. गेल्याच वर्षी त्याने आयपीएलमधील आपला पहिला सामना खेळताना किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकर ठोकत दिमाखात पदार्पण केले होते. यंदा ‘केकेआर’ने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. नव्या संघाकडून खेळण्यास उत्सुक असलेल्या सिध्देशने सांगितले की, ‘गेल्यावर्षी मी पहिल्यांदा आयपीएल सामना खेळलो. त्यामुळे यंदा अंतिम संघातून खेळण्याची मोठी संधी मिळेल, असा विश्वास आहे. मात्र या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आयपीएल होत आहे याचाच आनंद जास्त आहे. लॉकडाऊनदरम्यान सरावाची संधीच मिळाली नाही. यादरम्यान शारीरिक तंदुरुस्तीवर जास्त भर दिला.’
रोहितच्या यशाचा अभिमान
‘हिटमॅन’ रोहित शर्माला नुकताच देशातील सर्वोच्च ‘खेलरत्न’ क्रीडा पुरस्कार जाहीर झाला. सिध्देशचे वडिल दिनेश लाड हे रोहितचे शालेय प्रशिक्षक. वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवलेल्या सिध्देशने सांगितले की, ‘रोहितला खेलरत्न जाहीर झाल्याचा अभिमान आहे. रोहित चा प्रवास आम्ही जवळून पाहिला असल्याने तो आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.’
टी-२० क्रिकेटमध्ये फारसा विचार करण्याची संधी नसते. फलंदाजीचाही क्रमही निश्चित नसतोे. पण संघासाठी पूर्ण योगदान देण्यास सज्ज आहे. संघाच्या विजयात जास्तीत जास्त योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल. - सिध्देश लाड
Web Title: Glad the IPL is happening; Ready to play for Kolkata Knight Riders
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.