Mayanti Langer Ravi Shastri, IPL 2022 CSK vs KKR Live Updates: आय़पीएल स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. यंदाच्या IPL मध्ये ८ ऐवजी १० संघ असणार आहेत. या हंगामासाठी दोन खास चेहरे पुन्हा एकदा IPL मध्ये दिसू लागले. ग्लॅमरस अँकर मयंती लँगर-बिन्नी हिने २ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच ग्लॅमरस रूपाच IPL अँकरिंगमध्ये कमबॅक केलं. तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुमारे ५ वर्षांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनरागमन केलं.
अनुभवी टेलिव्हिजन अँकर आणि क्रिकेटमधील प्रसिद्ध चेहरा असलेली मयंती लँगर हिने पुनरागमन केलं. यंदाच्या आयपीएलमध्ये ती पुन्हा चाहत्यांना दिसली. तिने काही महिन्यांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मामुळे ती IPL च्या दोन सीझनमध्ये दिसली नव्हती. पण आता मात्र मयंती लँगर पुन्हा एकदा आयपीएलच्या ब्रॉडकास्टिंग टीमचा भाग बनली. IPL च्या 2020 सीझनमध्ये जेव्हा मयंती दिसली नाही, तेव्हा जगभरातील अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्या मुद्द्यावरून चाहत्यांनी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पण मग काही दिवसांनी मयंतीनेच या चर्चांना पूर्णविराम दिला. तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून आपण आई होणार असल्याची गोड बातमी साऱ्यांना दिली, त्यानंतर चर्चा बंद झाल्या. भारतीय क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीसोबत तिने लग्न केले आहे. "तुम्हा साऱ्यांचं प्रेम माझ्यावर आहे याची मला कल्पना आहे. मी गेली पाच वर्षे स्टार समूहासोबत मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये अँकर म्हणून तुमच्यासमोर आले आहे. पण सहा आठवड्यांपूर्वीच मी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे."
दरम्यान, रवी शास्त्रीही सुमारे ५ वर्षांहून अधिक काळानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये परतले. रवी शास्त्री भारतीय संघासोबत सर्वप्रथम २०१४ मध्ये संचालक म्हणून कार्यरत झाले. २०१६ टी-२० विश्वचषक संपेपर्यंत ते संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यानंतर वर्षभरासाठी अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले. २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पराभूत झाला. त्यानंतर शास्त्रींना पूर्णवेळ प्रशिक्षकपदी नेमण्यात आले. पण ICCच्या स्पर्धांमध्ये मात्र भारताला विजेतेपद मिळाले नाही. त्यानंतर T20 World Cup 2021 नंतर रवी शास्त्री प्रशिक्षक पदावरून पायउतार झाले. BCCIचा 'लाभाचं पद' (Conflict of Interest) हा नियम असल्याने अनेक वर्षे ते कॉमेंट्री बॉक्सपासून दूर होते.