ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell and Vini Raman tie the knot in traditional Indian way) याने रविवारी भारतीय परंपरेने प्रेयसी विनी रमण हिच्यासोबत लग्न केले. १८ मार्चला या दोघांनी ऑस्ट्रेलियन परंपरेनुसार लग्न केले होते, पण त्यांनी २७ मार्चला तमिळ पद्धतीने विवाह केला. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) अष्टपैलू खेळाडू मॅक्सवेल वाजत, गाजत वरात घेऊन आला आणि विनीच्या गळ्यात माळ घालण्याआधी त्याने डान्सही केला. सध्या सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
३३ वर्षीय मॅक्सवेलने लग्नासाठी पाकिस्तान दौऱ्यावरून माघार घेतली आणि आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकणार आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत मॅक्सवेल व विनी या दोघांनीही भारतीय पारंपरिक पोशाख परिधान केले आहेत. तमिळ ब्राह्मण त्यांच्या लग्नात दिसत आहेत आणि बॅकग्राऊंडला तमिळ संगीत वाजत आहे. ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण हे एकमेकांना मागील चार वर्षांपासून ओळखतात आणि फेब्रुवारी २०२०मध्ये त्यांनी साखरपुडा उरकला होता. विनी ही मेलबर्न येथे राहणारी असून ती ऑस्ट्रेलियात फार्मासिस्ट आहे. कोरोना व्हायरसमुळे या दोघांना लग्न अनेकदा स्थगित करावे लागले होते. पण, अखेरीस ते लग्नबंधनात अडकले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमामुळे ५ एप्रिलपर्यंत ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२२मध्ये सहभागी होऊ शकत नाही. RCBला पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्सकडून पराभव पत्करावा लागला. RCBने आयपीएल २०२२साठी विराट कोहली, मोहम्मद सिराज यांच्यासह मॅक्सवेलला ११ कोटींत आपल्या ताफ्यात कायम राखले आहे. आयपीएल २०२१मध्ये त्याने १५ सामन्यांत ४२.७५च्या सरासरीने ५१३ धावा केल्या होत्या.