इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) आगामी मोसमाच्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला. संघातील प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चरनं दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा गोलंदाज आर्चर जून मध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून पुन्हा मैदानावर परणार आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. राजस्थानपाठोपाठ आता किंग्स इलेव्हन पंजाबला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची संकेत मिळत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं कोपऱ्याच्या दुखापतीमुळे आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे आणि त्याच्या जागी ऑसी संघात आता डी'आर्सी शॉर्टचा समावेश करण्यात आला आहे. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दिली. त्यामुळे मॅक्सवेल आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 29 मार्चपासून आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला सुरुवात होणार आहे.
बिग बॅश लीगमध्ये मॅक्सवेल खेळला होता. त्या लीगमध्ये डाव्या हाताच्या कोपऱ्यात वेदना होत असल्याचे त्यानं ऑस्ट्रेलिया संघाच्या वैद्यकिय टीमला सांगितले होते. त्या वेदना आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे त्याला उपचार घ्यावे लागणार आहेत. दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साजेशी कामगिरी करता येणार नसल्याची भीती मॅक्सवेलला वाटत होती. त्यामुळेच त्यानं आफ्रिका मालिकेतून माघार घेतली. तो म्हणाला,''ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करणे हे मी भाग्य समजतो. पण, या वेदना घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करेन, असा विश्वास मला वाटत नाही. त्यामुळे मी या दुखापतीवर शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय घेत आहे.''
मॅक्सवेलची दुखापत हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्काच आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत मॅक्सवेलची उणीव जाणवली होती. बिग बॅश लीगमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला भारत दौऱ्यासाठी निवडलेल्या ऑसी संघातून डावलण्यात आले होते. ऑक्टोबर 2019मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत मध्यंतरात मानसिक तणावामुळे विश्रांती घेतली होती. पण, त्यानंतर त्यानं बिग बॅश लीगमध्ये प्रत्येक सामना खेळला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तो उत्सुक होता. आयपीएल लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबनं त्याच्यासाठी 10.75 कोटी रुपये मोजले आहेत.