इंडियन प्रीमिअर लीग २०२४ हे पर्व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी काही खास गेलेले नाही. सातपैकी १ सामनाच त्यांना जिंकता आला आहे आणि प्ले ऑफमध्ये जागा पटकावची असल्यास त्यांना उर्वरित सातही सामने जिंकावे लागतील व अन्य संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. त्यात स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) याला अपयश आले आणि त्याने अनिश्चित काळासाठी आयपीएल २०२४ मधून माघार घेतल्याचे जाहीर केले. पण, दरम्यान मॅक्सवेलने अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटच्या (MLC) दुसऱ्या सत्रात खेळणार असल्याची घोषणा केली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर MLC चा दुसरा हंगाम अमेरिकेत खेळवला जाईल.
ESPNcricinfoशी बोलताना ग्लेन मॅक्सवेलने मेजर लीग क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन फ्रीडम संघासोबत करार केला असल्याचे सांगितले. तो म्हणाला,'' या मोसमात मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी मी वॉशिंग्टन फ्रीडम संघासोबत करार केला आहे. या संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका रिकी पाँटिंग बजावणार असून स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांचाही समावेश आहे. मी गेल्या वर्षी ही लीग पाहिली होती आणि त्याचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. सुदैवाने यावर्षी मला MLC मध्ये खेळण्याची संधी मिळत आहे. आरसीबीचा आणखी एक सहकारी ल्युकी फर्ग्युसनही त्या संघात माझ्यासोबत असेल. ''
ग्लेन मॅक्सवलेने यावेळी आयपीएलमध्ये RCB साठी ६ सामन्यांत केवळ ३२ धावा करू शकला आहे. अमेरिकेत होणाऱ्या MLCच्या दुसऱ्या सत्रात मॅक्सवेल, स्मिथ आणि हेड यांच्याशिवाय ॲडम झम्पा (लॉस एंजेलिस नाईट रायडर्स), स्पेन्सर जॉन्सन (नाईट रायडर्स), टिम डेव्हिड (एमआय न्यूयॉर्क), मॅथ्यू शॉर्ट (सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स) ), जेक फ्रेझर- मॅकगर्क (सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स) सारखे ऑस्ट्रेलियन खेळाडू या लीगमध्ये खेळणार आहेत.