Glenn Maxwell, AUS vs AFG: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानला अतिशय धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २९२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचे ७ गडी ९१ धावांत बाद केले होते. त्यानंतर मात्र ग्लेन मॅक्सवेलने तुफानी फलंदाजी केली. मॅक्सवेलने १२८ चेंडूत २०१ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याला क्रँप आल्याने खूप वेदना झाल्या होत्या. पण त्या वेदनेसह तो खेळत राहिला आणि त्याने ऑस्ट्रेलियाला अप्रतिम असा विजय मिळवून दिला. या मॅचविनिंग खेळीच्या मागे नक्की काय रहस्य आहे, असा सवाल मॅक्सवेलला करण्यात आला. त्यावर मॅक्सवेलने जी आयडिया वापरली, त्याबद्दल माहिती दिली.
९१ धावांत ७ बळी असताना कशी खेळली मॅचविनिंग खेळी?
ग्लेन मॅक्सवेलने सामन्यानंतरच्या समारंभात काही गोष्टींचा उल्लेख केला. तो म्हणाला की जेव्हा त्याचा संघ 7 विकेट्सवर 91 धावा करून संकटात होता, त्यावेळी संघ लाजिरवाण्या पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना दिसला. अशा वेळी केवळ सकारात्मक विचार हाच माझ्याकडे पर्याय होता. दुसरा कोणताही पर्याय नव्हता. माझ्याकडे प्लॅनिंग करण्यासाठी फारशा गोष्टी नव्हत्या. शक्य तितकी सकारात्मक फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. जर मी बचावात्मक खेळायला गेलो असतो, तर मी बाद झालो असतो. त्यामुळे मी योग्य चेंडूंवर फटकेबाजी करण्याकडे लक्ष केंद्रित केले. एकदा मला डीआरएसने वाचवले आणि त्यानंतर मला पिचवरच्या बाऊन्सचा अंदाज आला. त्यानंतर मग मी काउंटर अटॅक करायला सुरूवात केली.
जीवनदानावर मॅक्सवेल काय म्हणाला?
मॅक्सवेल २७ धावांवर LBW च्या निर्णयातून वाचला आणि ३३ धावांवर झेलबाद होता होता वाचला. त्यानंतर त्याने मुंबईत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. तो म्हणाला, 'जलद खेळी झाली असती तर बरे झाले असते, पण माझ्या काही संधी वाया गेल्या." या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचे चार झेल सुटले. सुरुवातीला मॅक्सवेलवर खूप टीका झाली. भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात झालेल्या पराभवानंतर संघाने त्याला संघाबाहेरही केले. त्यानंतर संघात येऊन त्याने काही छोट्या खेळी केल्या. नेदरलँड्स विरूद्ध त्याने जलद शतक ठोकले. अफगाणिस्तानच्या सामन्यादरम्यान अनेकवेळा स्नायूंच्या दुखण्याने त्रस्त झालेला मॅक्सवेल म्हणाला की, मी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. अतिउष्णतेमुळे आणि खेळापूर्वी पुरेसे वॉर्म अप व्हायला न मिळाल्यामुळे फटका बसला. पण आता मी पुढील सामना खेळण्यास सज्ज आहे.