Glenn Maxwell injured: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज आणि एक उत्तम फिल्डर असलेला खेळाडू म्हणजे ग्लेन मॅक्सवेल. तो त्याच्या तडाखेबाज खेळासाठी आणि मैदानावरील चपळतेसाठी ओळखला जातो. पण गेल्या काही वर्षात तो विविध कारणांमुळे क्रिकेटच्या मैदानात आत-बाहेर करताना दिसतोय. मॅक्सवेल पायाच्या दुखापतीमुळे गेल्या ४ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता. त्याआधीही मानसिक ताण आल्याने त्याने क्रिकेटपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो विवाहबद्ध झाला आणि IPL खेळला. पण नंतर पुन्हा एकदा तो पायाच्या दुखापतीने हैराण झाला होता. अखेर ४ महिने विश्रांती घेतल्यानंतर मॅक्सवेल पायाच्या दुखापतीतून सावरला आणि तब्बल ४ वर्षांनंतर शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत परतला. पण त्याच्या नशिबाने पुन्हा एकदा त्याला दणका दिला.
चेंडू लागून झाली दुखापत, जावं लागलं मैदानाबाहेर
व्हिक्टोरिया विरुद्ध दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात मॅक्सवेल स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. त्यानंतर चेंडू फलंदाजाच्या बॅटची कड घेऊन त्याच्या दिशेने गेला. तो झेल नव्हता, पण क्षेत्ररक्षण करताना चेंडू मॅक्सवेलच्या मनगटावर जोरात आदळला. या दुखापतीमुळे त्याने जागीच मनगट पकडले. तो वेदनेने ओरडताना दिसत होता. त्यानंतर संघातील सहकाऱ्यांनी मॅक्सवेलची विचारपूस केली. फुटेजने दिसलेल्या प्रकारामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.
शेफिल्ड शिल्डमध्ये क्षेत्ररक्षण करताना मॅक्सवेलला दुखापत झाली, त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की तो कसा मनगट धरून मैदानाबाहेर जात आहे. या दुखापतीमुळे त्याला किती वेदना झाल्या आहेत, हे त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून कळू शकते. त्यामुळे आता मॅक्सवेलची दुखापत किती मोठी आहे आणि त्याला किती काळ विश्रांती घ्यावी लागणार याकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, उपहाराच्या ब्रेकमध्ये तो नेट्समध्ये सराव करताना दिसल्याने दुखापत फारशी गंभीर नसल्याचेही बोलले जात आहे.