Glenn Maxwell Vini Raman Wedding: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रामनशी रविवारी (२७ मार्च) तमिळ रितीरिवाजांनुसार विवाह केला. या दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने आधीच लग्न केलं होतं. पण भारतीय संस्कृतीचा चाहता असलेल्या मॅक्सवेल काल तमिळ रितीरिवाजांनुसार विनीशी विवाहबद्ध झाला. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सने (CSK) देखील मॅक्सवेलचे अभिनंदन केले. त्यांचा अभिनंदन करण्याचा अंदाज थोडा हटके होता. सोशल मीडियावर मॅक्सवेल आणि विनीचा एक फोटो शेअर करत चेन्नई फ्रँचायझीने लिहिले, 'मॅक्सवेल चेन्नईचा नवरदेव बनला आहे. त्याला विवाहाच्या खूप शुभेच्छा, तुमच्या नवीन भागीदारीसाठी सदिच्छा आणि 'व्हिसल पोडू' (शिट्ट्या वाजवून अभिनंदन).'
लग्नामुळे मॅक्सवेल पहिल्या सामन्याला मुकला!
ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून क्रिकेट खेळताना दिसणार आहे. फ्रँचायझीने त्याला चालू हंगामात ११ कोटी रुपयांसह रिटेन केले आहे. २६ मार्चपासून आयपीएलला सुरुवात झाली. पण RCB च्या पहिल्या सामन्यात (२७ मार्च) तो खेळू शकला नाही.
RCBच्या हंगामाची पराभवाने सुरूवात
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास ड्यूप्लेसिस, विराट आणि दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीमुळे बंगळुरूने दोनशेपार मजल मारली. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भानुका राजपक्षेने ४३, शिखर धवनने ४३ आणि मयंक अग्रवालने ३२ धावा करत चांगला पाया रचला. त्यानंतर शेवटच्या ५ षटकांत ५० हून अधिक धावांची गरज असताना शाहरूख खानने २० चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. पण विशेष म्हणजे, ओडियन स्मिथने केवळ ८ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकार खेचत नाबाद २५ धावा केल्या आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला.